Loksabha 2019 महाआघाडीचं जमलं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन (हातकणंगले आणि सांगली शक्‍य), तर राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीला पालघरची आणि युवा क्रांती पक्षाला अमरावतीची जागा सोडली. या महाआघाडीमध्ये साठहून अधिक विविध पक्ष आणि संघटनांचाही समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन (हातकणंगले आणि सांगली शक्‍य), तर राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीला पालघरची आणि युवा क्रांती पक्षाला अमरावतीची जागा सोडली. या महाआघाडीमध्ये साठहून अधिक विविध पक्ष आणि संघटनांचाही समावेश आहे.

पुरोगामी विचारांच्या पक्षांनी 
एकत्र येऊन जातीयवादी भाजप-शिवसेनेच्या विरोधात लढा उभारावा. या हेतूने काँग्रेस-राष्ट्रवादीने मोट बांधण्याची तयारी केली. मात्र, काही पक्षांनी त्यामध्ये सतत खोडा घालण्याचे काम केले,’ असा दावा करीत, ‘जे पक्ष काहीही मागण्या करीत महाआघाडीपासून दूर झाले. त्यांना मुळात आघाडीत यायचेच नव्हते. सहा जागा सोडण्याची तयारी आम्ही केली, पण त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशी आघाडी म्हणजे भाजपची ‘बी टीम’ असल्याचेच स्पष्ट होते,’ असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज बहुजन वंचित आघाडीचे नाव न घेता केला. 

या वेळी पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, खासदार राजू शेट्‌टी,  छगन भुजबळ, अजित पवार, हितेंद्र ठाकूर, रवी राणा,  प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, सचिन खरात आदी नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे पाटील मात्र अनुपस्थित होते.

नेत्यांची टीकास्त्रे
संविधानविरोधी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ही महाआघाडी झाली असून, मोदी सरकारच्या धोरणावर सर्वच वर्गातील जनतेचा रोष असल्याचा सूर या नेत्यांनी आळवला. मागील पाच वर्षांत शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अल्पसंख्याक, व्यापारी, दुकानदार यांच्या विरोधातच मोदी सरकारने धोरणे आखली. ‘अच्छे दिन’चा भुलभुलय्या करून ‘लुच्छे दिन’ आणल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. दलित अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित, पीडितांना न्याय देण्यासाठी व समता-बंधुत्व-स्वातंत्र्य यासाठी महाआघाडी असल्याचे अशोक चव्हाण व जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप व संघ परिवाराकडून साम दाम दंड भेद नीतीने कुटिल राजकारण केले जात आहे. देशाची एकता व अखंडता यासाठी हे राजकारण धोक्‍याची घंटा असल्याचा आरोपदेखील या वेळी करण्यात आला. मराठा-धनगर-मुस्लिम समाजाची फसवणूक भाजप सरकारने केली आहे. मराठा आरक्षणाचा कायदा केल्याचे सांगितले जात असले, तरी आरक्षणातून नियुक्तिपत्र देऊ नये, असे आदेश देत सरकारने फसवणूक केली आहे. मुस्लिम समाजाला न्यायालयाने वैध ठरवलेले आरक्षणदेखील या सरकारने नाकारले. त्यामुळे जातपात व भेद करणारे हे मनुवादी सरकार उलथून टाकण्यासाठी महाआघाडीने निर्धार केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केली.

चव्हाण यांच्या क्‍लिपने खळबळ
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूरमधील जागेबाबत एका कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपलेच पक्षात कुणी ऐकत नसल्याने मीच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे विधान केले होते. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली होती. याबाबत चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, आपण संबंधित संभाषण ऐकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुरोगामी विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन जातीयवादी भाजप-शिवसेनेच्या विरोधात लढा उभारावा. या हेतूने काँग्रेस-राष्ट्रवादीने मोट बांधण्याची तयारी केली. मात्र, काही पक्षांनी त्यामध्ये सतत खोडा घालण्याचे काम केले त्यांना मुळात आघाडीत यायचेच नव्हते. तेच भाजपची ‘बी’ टीम आहेत
- अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

पाच वर्षांत शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अल्पसंख्याक, व्यापारी, दुकानदार यांच्या विरोधातच मोदी सरकारने धोरणे आखली. ‘अच्छे दिन’चा भुलभुलय्या करून ‘लुच्छे दिन’ आणण्यात आले. वंचित, पीडितांना न्याय देण्यासाठी व समता-बंधुत्व-स्वातंत्र्य यासाठी ही महाआघाडी स्थापन झाली आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

केंद्र-राज्यातील भाजपच्या सरकारने सर्वच वर्गाचा विश्वासघात केला आहे. सामाजिक व धार्मिक ऐक्‍यदेखील या सरकारने जाताजातींत तेढ निर्माण करून धोक्‍यात आणले आहे. कमळाच्या फुलावर तणनाशक फवारून ते नष्ट करण्याची वेळ आली आहे.
- राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Mahaaghadi Politics Congress NCP