Loksabha 2019 : हा तर वंचित बहुजनांचा लोकलढा!

संदीप भारंबे
बुधवार, 17 एप्रिल 2019

सध्याचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार असो की, अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार. या सर्वांनीच बहुजन समाजातील मोठ्या घटकाला कायम वंचित ठेवण्याचेच काम केले. त्यांना सामाजिक अन्‌ आर्थिकदृष्ट्या पुढे येऊच दिले नाही. आता बहुजनांमधील हा घटक मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. सामाजिक वंचितांची आणि स्वतःला वंचित समजणाऱ्यांची ही लढाई आता लोकांची लढाई झाली आहे. त्यामुळे वंचित बहुजनांची दखल ही घ्यावीच लागेल, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी संदीप भारंबे यांना दिलेल्या खास मुलाखतीत केले. या मुलाखतीचा संपादित अंश - 

प्रश्न - वंचित बहुजन आघाडीच का?  
आंबेडकर -
 देशातील ४० टक्के मतदार आणि आजवर मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेला बहुजन समाज जागृत झाला आहे. त्यांच्या आशा-आकांक्षा आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची ही लढाई आहे. हा वंचितांचा समूह प्रत्येक सभेनंतर आमच्याशी जे बोलत होता, वचनबद्धता सांगत होता, त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत.

प्रश्न - निवडणुकीसाठीची आर्थिक ताकद कशी उभी करता?
आंबेडकर -
 अर्थात लोकांकडूनच. पूर्वी आर्थिक ताकद नसल्याने गप्प राहावे लागत होते. यंदा वंचित बहुजनांमधून निवडणुकीसाठी आर्थिक किंवा प्रत्यक्ष सहभागाच्या रूपाने मदत होत आहे. चंद्रपूरच्या मेळाव्यात तर सर्वसाधारण घरातील दोन महिलांनी त्यांची मंगळसूत्रे आम्हाला दिली. आम्ही या महिलांच्या भावनांचा आदर ठेवला. दोन्हीही मंगळसूत्रे सांभाळून ठेवली आहेत. निवडणुकीनंतर आम्ही त्यांना ती परत करू. या महिला अतिशय साधारण घरातील आहेत. काहीवेळा दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बहुजन समाजातील महिलेने प्रचारासाठी मंगळसूत्र देणे, ही आमच्यासाठी क्रांतिकारी घटना आहे. अशा पद्धतीने हे काम चालते. आता आम्हाला प्रश्न विचारला जातोय की, पैसा कुठून उभा राहतो. यामागील गर्भितार्थ असा आहे की, आम्ही तुम्हाला गरीब ठेवलं होतं. आम्ही बघितलं की, तुम्ही गरीबच राहा; पण आता तुमच्याकडे ‘रिसोर्स’ आले कुठून. हा प्रश्न केला जात आहे. बहुजनांकडे ‘रिसोर्स’ आले कोठून, हे या लोकांना बघवत नाही, म्हणून असे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न - काही जागा देऊ केल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी का केली नाही? 
आंबेडकर -
 मूळतः आमचं जागांसाठी भांडण नाही. भांडण आहे ते मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या अंतर्गत आणण्याचं आहे. गेल्या ७० वर्षांत माळी, धनगर उमेदवार लोकसभेत गेला नाही. त्यांना उमेदवारी द्या, ओबीसीतील लहान घटकांना, मुस्लिमांना उमेदवारी द्या. आम्ही जिंकलेल्या जागा मागितल्याच नव्हत्या. जेथे उमेदवार नाहीत त्या द्या, अशी मागणी केली होती; पण त्यांनी नाकारल्याने आम्हाला ४८ जागा लढणे अपरिहार्य ठरलं.   

प्रश्न - वंचित आघाडीच्या राजकारणामुळे रिपब्लिकन चळवळ मागे पडली असे वाटते का?
आंबेडकर -
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा ‘मूकनायक’ सुरू केले, नंतर ‘बहिष्कृत’ सुरू केले, त्यानंतर ‘जनता’ अन्‌ नंतर ‘प्रबुद्ध भारत’ ही नियतकालिके सुरू केली. प्रत्येक टप्प्यातील त्रुटी दूर झाल्यानंतर ते तेथे अडकून राहिले नाहीत. ते पुढे पुढे गेले. नावामध्ये त्यांनी चळवळ कधीच अडकवली नाही; तर त्यांनी नावाच्या माध्यमातून आपली चळवळ काय, हे ते लोकांना सांगत गेले. आम्हीसुद्धा हेच करीत आहोत. बहुजनांची 
चळवळ झाली. त्यानंतर आता वंचितांची चळवळ आहे. वंचितांचे आम्ही ब्रिदवाक्‍य केले आहे, ‘आम्ही वंचित आहोत. यापुढे कुणाला वंचित राहू देणार नाही’. 

प्रश्न - विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी पुन्हा चर्चा करणार का?
आंबेडकर -
 आम्ही विधानसभेसाठीही स्वतंत्रपणे लढणार आहोत. आता ते दरवाजे आम्ही बंद केलेत. आम्ही सर्वांना घेऊन पुढे जाण्याच्या विचारात होतो; परंतु वर्चस्वाची मानसिकता जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली आहे आणि ती कुटुंबशाहीतून आली आहे. त्या शूद्र मानसिकतेबरोबर जावे, असे आम्हाला आता वाटत नाही. 

प्रश्न - लोकसभा निवडणुकीमध्ये यशाची किती खात्री वाटते?
आंबेडकर -
 आता यशाची खात्री म्हणण्यापेक्षा मी मतदारांचे मत मांडेन. आज वंचित घटक आमच्या बाजूने आहेत. उद्या, मुस्लिमांनी थेट आमच्याकडे आल्यास अनेक मतदारसंघांमधील निकालदेखील आमच्या बाजूने लागतील. चार जागा आम्हाला मिळाल्या तरी देशातील ही दुसऱ्या क्रमांकाची क्रांती ठरेल. हे एक मोठे सोशल ट्रान्स्फॉर्मेशन ठरेल. लोकशाही खऱ्या अर्थाने निर्माण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics Prakash Ambedkar Interview Vanchit Bahujan Aghadi