Loksabha 2019 : विरोध पत्करून मोहिते पाटलांना संधी दिली - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

कारखानदारी बुडविणाऱ्यांसाठी मोदींच्या सभा
अकलूजच्या सभेत मोदी म्हणाले की, मी केवळ ऊस धंद्याचे पाहतो. त्या वेळी त्यांच्या मंचावर साखर धंदेवालेच बसले होते. ज्यांनी विजय शुगर बुडविला. सहकारमहर्षी कारखान्याची आजची अवस्था पाहा. कुल यांच्या भीमा-पाटस कारखान्याचीही अवस्था पाहा. या कारखान्यातील कामगारांचा २२ महिन्यांचा पगार थकला आहे. असे कर्तबगार लोक घेऊन मोदी सभा गाजवत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

नातेपुते - राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. ‘अंदर का मामला’ दुसराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

माढा लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ नातेपुते (ता. माळशिरस) येथे पवार यांची जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी यांच्या सभेनंतर पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

पवार म्हणाले की, संजय शिंदे यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीला पक्षाने संधी दिली आहे. जुन्या सहकाऱ्यांबद्दल मी वाईट बोलत नसतो. माझी चूक झाली, मी मोहिते पाटील यांना राजकारणात मदत केली. त्यांनी सामान्यांमध्ये परिवर्तन न करता सहकार संपविला.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या वडिलांना भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसवत आहे. त्यांची काळजी वाटते, असे पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Vijaysinh Mohite Patil Politics