Loksabha 2019 : प्रवाशांची एसटी बनणार ‘निवडणूक एक्‍स्प्रेस’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

बस सेवेवर परिणाम
सोमवारी व मंगळवारी या बस निवडणुकीच्या कामात गुंतणार आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील तसेच लांब पल्ल्याच्या बस रद्द होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील बस सेवेवर होणार आहे.

सातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही पूर्ण तयारीनिशी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन केले आहे. इव्हीएम मशिन, व्हीव्हीपीएटी मशिन आदी मतदानासंबंधित यंत्रणा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ३८४ बसचे तसेच ४८ खासगी बसचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी गावोगावी, शहरातील वॉर्डमध्ये प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत. २३ रोजी मतदान होत असल्याने उमेदवार प्रचाराची सूत्रे वेगाने हलवत आहेत. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी गतिमान कारभार सुरू ठेवला आहे. मंगळवारी (ता. २३) रोजी मतदान होणार असल्याने सोमवारी बसद्वारे अधिकारी, कर्मचारी मतदान यंत्रांची वाहतूक केली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या बसद्वारे संबंधित स्ट्राँगरूमपर्यंत मतपेट्या आणल्या जाणार आहेत. त्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत राज्य परिवहन महामंडळाच्या ३८४ बसचे, तर ४८ मिनी बसचे अधिग्रहण केले जाणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, एसटीचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 ST Election Express