Loksabha 2019 : ऊर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने रंगत!

कृष्ण जोशी
बुधवार, 24 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख समस्या

  • नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्या सुविधांपासून दूर
  • दहिसर आणि पोयसर नद्यांचे प्रदूषण
  • गोरेगावपर्यंतचा हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार
  • उपनगरी रेल्वे प्रवाशांचे हाल, प्रमुख रस्त्यांवरील कोंडी
  • वेगाने वाढणाऱ्या झोपड्या आणि पावसाळ्यात तुंबणारे पाणी

भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील लढत सुरवातीला भाजपसाठी खूपच सोपी मानली जात होती; मात्र अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशामुळे लढत रंगतदार झाली आहे. तरुणांची मते खेचण्यात ऊर्मिला यांना यश मिळाले, तर भाजपपुढे ते आव्हान ठरू शकेल. 

२०१४ मधील मोदी लाटेचा प्रभाव आता बराचसा ओसरला असला, तरी कामांच्या जोरावर बाजी मारू, असा विश्‍वास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा कोणीही मातब्बर नेता लढण्यास उत्सुक नव्हता, त्यामुळे शेट्टी निश्‍चिंत होते; मात्र ऊर्मिला यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांनी आपली रणनीती बदलली आणि आपण सर्व भाषकांचे लाडके आहोत, असे भासवण्यास सुरवात केली. मध्यंतरी वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन्ही उमेदवार चर्चेत आले होते; मात्र आता दोघे प्रचारात काळजी घेत आहेत. 

या मतदारसंघात राष्ट्रीय प्रश्‍नांचीफारशी चर्चा नाही. ते मुद्दे केंद्रस्थानी नाहीतच; तसेच राज ठाकरेंचीही चर्चा नाही. वैयक्तिक करिष्मा आणि विकासकामांवर दोन्ही उमेदवारांचा भर आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघांप्रमाणेच येथेही दूषित पाण्यासह काही स्थानिक समस्या आहेत. त्यांचा फटका शेवटी खासदाराला बसतोच. गुजराती आणि दाक्षिणात्य मतांसह शिवसेनेच्या मतांवर शेट्टी यांचा भर आहे, तर ‘मनसे’सह दलित, मुस्लिम मतांवर ऊर्मिला यांची भिस्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Urmila Matondkar Congress BJP Politics