Loksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन‘मत’ आज मतपेटीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

देशभर ९५ जागांसाठी मतदान
अकरा राज्ये, केंद्रशसित पुद्दुचेरीतील मिळून लोकसभेच्या ९५ जागांसाठी उद्या (ता. १८) रोजी मतदान होईल. तमिळनाडूत लोकसभेच्या ३९ मतदारसंघांपैकी ३८ जागांवर, विधानसभेच्या १८ जागांसाठीही मतदान होणार आहे. या टप्प्यात १,६०० उमेदवार रिंगणात आहेत. कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशातील आठ, आसाम, बिहार व ओडिशातील प्रत्येकी पाच, छत्तीसगड व पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्‍मिरातील दोन आणि मणिपूर, पुद्दुचेरीतील प्रत्येकी एका जागेचा उद्याच्या मतदानात समावेश आहे. 

.ओडिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही उद्या मतदान होईल. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, ज्युएल ओराम, सदानंद गौडा, पोन राधाकृष्ण, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तसेच द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा आणि कनिमोळी, वीरप्पा मोईली, राज बब्बर आणि हेमामालिनी आदी नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वांत कमी दहा उमेदवार लातूर मतदारसंघात आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा मतदारसंघात १२ उमेदवार, अकोला ११, अमरावती २४,  हिंगोली २८, नांदेड १४, परभणी १७, उस्मानाबाद १४ आणि सोलापूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पंधरापेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदारसंघ असून, यापैकी बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे तीन बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघांत प्रत्येकी दोन बॅलेट युनिट, तर अन्य सहा मतदारसंघांत प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम (३७ हजार ८५० बॅलेट युनिट आणि २४ हजार ८५० कंट्रोल युनिट), तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे दहा टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून, जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting System Ready