युतीपूर्वी मित्रपक्षांना डावलले - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 February 2019

पुणे - ‘भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचा आनंद आहे. युतीसाठी मीही प्रयत्न करीत होतो; परंतु युतीच्या घोषणेआधी मित्रपक्षांना विचारलेही नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची एक आणि विधानसभेच्या आठ जागा हव्यातच, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले.

पुणे - ‘भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचा आनंद आहे. युतीसाठी मीही प्रयत्न करीत होतो; परंतु युतीच्या घोषणेआधी मित्रपक्षांना विचारलेही नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची एक आणि विधानसभेच्या आठ जागा हव्यातच, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले.

पुण्यात पत्रकार परिषदेत आठवले यांनी आगामी निवडणुका, युती, आघाडी यासंदर्भात चर्चा केली. आठवले म्हणाले, ‘‘लोकसभेला दक्षिण मध्य मुंबईची जागा हवी आहे. युतीने ती आम्हाला सोडावी. मित्रपक्षाला विचारात घेतल्याशिवाय युतीचे उमेदवार निश्‍चित करू नयेत.’’ राजकारणामध्ये माझ्या नावाला महत्त्व असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. याचा अर्थ मला विचारात न घेता युतीचे निर्णय घेतले जावेत, असा होत नाही. आम्हाला अनुल्लेखाने बाजूला सारले तर, आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराही आठवले यांनी दिला. मी सरळ मनाचा माणूस आहे, असे सांगत आठवले म्हणाले, ‘‘माझ्याशी कोणी वाकड्यात वागले तर, त्याच्याशी मीही वाकडा वागेन.  शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून भेटीचे निमंत्रण येत आहे. पण, भाजप-सेना मित्रपक्षाला न्याय देतील,’’ अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, बाळासाहेब जानराव, महेश शिंदे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीमुळे सभांना गर्दी
वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख करून आठवले म्हणाले, ‘‘प्रकाश आंबेडकर यांच्या सभा कधी मैदानात होत नव्हत्या. कारण, त्यांच्या सभेला कोणी येत नव्हते. वंचित बहुजन आघाडीमुळे आंबेडकर यांच्या सभेला लोकांची गर्दी होत आहे; परंतु सभेला होणाऱ्या या गर्दीचे रूपांतर मतदानात होत नाही,’’ असा टोलाही त्यांनी लावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Yuti Shivsena BJP Other Party Ramdas Athawale Politics