‘कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अभय’

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 April 2019

संगमनेर - ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज दिली. काँग्रेस जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेचे स्वरूप सांगताना ही योजना भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘जम्प स्टार्स्ट’ असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

संगमनेर - ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज दिली. काँग्रेस जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेचे स्वरूप सांगताना ही योजना भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘जम्प स्टार्स्ट’ असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी येथे आज रात्री झालेल्या जाहीर सभेत गांधी बोलत होते. विमानातील बिघाडामुळे आज दिवसभरातील सर्व सभा दोन ते अडीच तास उशिरा सुरू झाल्याने गांधी यांना सभास्थानी पोचण्यास तब्बल तीन तास उशीर झाला. ते ओझर (नाशिक) येथील विमानतळापासून सुमारे सत्तर किलोमीटर कारने प्रवास करून संगमनेरला नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी पोचले. त्यानंतर २६ मिनिटांच्या भाषणात गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेची विस्ताराने फोड करून सांगितली. मोदींनी १५ लाख रुपये सर्वांच्या बॅंक खात्यावर टाकण्याचे खोटे आश्‍वासन  देऊन फसविले. मी १५ लाखांचे आश्‍वासन देणार नाही. पण किमान पाच कोटी कुटुंबांच्या खात्यावर दर वर्षी ७२ हजार रुपये टाकणार आहे. अर्थव्यवस्थेला कोणतेही नुकसान न पोचविता ही रक्कम देणे शक्‍य असल्याचे आमच्या तज्ज्ञांच्या टीमने स्पष्ट केले आहे. ही रक्कम टाकल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालनाच मिळणार आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

हजारो कोटींची कर्जे बुडविणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासारख्यांना नरेंद्र मोदी यांनी देशातून पळवून लावले; मात्र शेतीसाठी घेतलेले थोडेसे कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात पाठविले जाते. परंतु यापुढे असे होणार नाही. शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्याबद्दल आता तुरुंगवास भोगावा लागणार नाही, असे आश्‍वासन राहुल यांनी दिले. मोदी यांनी अनिल अंबानी यांचे ३५ हजार कोटींचे कर्ज माफ केले, निवडक पंधरा उद्योजकांनाच मदत केली, आम्ही मात्र २५ कोटी लोकांना मदत करणार आहोत. शेतकऱ्यांचे मागील पाच वर्षांतील नुकसान भरून काढण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचाच एक भाग म्हणून याच वर्षी देशाच्या मुख्य अर्थसंकल्पाआधी शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे गांधी यांनी सांगितले. 

रोजगारावर भर देताना गांधी म्हणाले, की सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते आश्‍वासनही ‘चुनावी जुमला’ होते. आम्ही दोन कोटींना रोजगाराचे आश्‍वासन देणार नाही; मात्र सध्या शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर २२ लाख तरुणांना नोकऱ्या एका वर्षात दिल्या जातील. त्यातील दहा लाख तरुणांना तातडीने पंचायतींमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. 

उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना सध्या सरकारी परवाने मिळविण्यासाठी झगडावे लागते; मात्र काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कोणत्याही व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी पहिली तीन वर्षे परवान्याची गरज राहणार नाही. उद्योग व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यासाठी परवाना मागावा लागेल. उद्योग- व्यवसाय चालत नसेल, तर परवान्याची गरजच उरणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल म्हणाले, की नीरव मोदीला ३५ हजार कोटींचे कर्ज देऊन मोदींनी पळवून लावले. राफेल घोटाळ्यात अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्यामुळे संपूर्ण देशाला माहीत आहे, की चौकीदाराने काय केले आहे! त्यामुळे या निवडणुकीतील लढाई ‘नफरत, बटवारा और झूट’ यांच्या विरोधात ‘प्यार, भाईचारा और सच्चाई’शी आहे, अशा शब्दांत गांधी यांनी भाषणाचा समारोप केला.

राहुल म्हणाले
‘न्याय’ योजना अर्थव्यवस्थेला गती देणार
‘न्याय’मुळेच तरूणांना रोजगारही मिळणार
नोटाबंदी, जीएसटीतून लोकांना लुटले
कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार
सत्ता मिळाल्यानंतरही मोदींनी थापाच मारल्या
आम्ही कर्जमाफीचे आश्‍वासन पूर्ण केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi was speaking at a public meeting held for the campaigning of Congress candidates in Shirdi constituency