Loksabha 2019  : मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत ६५ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले.

यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे पाहण्यात येणाऱ्या अडचणी, बाचाबाची, मतदान करीत असताना मोबाईलवर फोटो काढून व्हायरल करण्याचे प्रकार आदी बाबींचा अपवाद सोडला तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांत उत्साह होता. त्यामुळे रांगा कायम होत्या. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाल्याने भरदुपारी मतदान प्रक्रिया काहीशी संथ झाली तरी फारसा परिणाम झाला नाही. काही केंद्रांवर सायंकाळी गर्दी झाल्यामुळे उशिरापर्यंत मतदानाची संधी देण्यात आली.

नांदेडमध्ये उत्साह
नांदेड - नांदेड मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ६१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहापर्यंत ते ६५ टक्के झाल्याचा अंदाज व्यक्त झाला. तरुणाईपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनीही मतदान केल्यानंतर अनेक केंद्रांना भेटी दिल्या. काही मतदान केंद्रांवर किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह १४ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले.

परभणीत चांगला प्रतिसाद
परभणी - परभणी मतदारसंघात सायंकाळी सहापर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. जवळपास १२ लाख ४२ हजार ७१७ मतदारांनी हक्क बजावल्याचा अंदाज आहे. रात्री सातपर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे टक्केवारीत बदल होण्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात मुख्य लढत असून १७ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले.

हिंगोलीत सकाळ-सायंकाळी गर्दी
हिंगोली - हिंगोली मतदारसंघात ६४ ते ६६ टक्‍के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ६७ केंद्रांवर मतदारांच्या रांगा कायम होत्या. त्यामुळे प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली होती. मतदारसंघातील एक हजार ९८९ मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदानाला सुरवात झाली होती. सकाळी सात ते नऊ यावेळेत केवळ सात टक्‍के, सकाळी अकराला ३४, दुपारी तीनपर्यंत ४५, पाचपर्यंत ५६ टक्‍के मतदान झाले होते. दुपारच्या वेळी काही केंद्रांवर गर्दी कमी होती. २८ उमेदवार असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात मुख्य सामना आहे.   

बीडमध्ये सुरळीत प्रक्रिया
बीड - भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीने रंगत वाढविलेल्या बीड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी साधारण ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत आहे.

राज्यात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० लाख ४१ हजार १८१ मतदार होते. २३२५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सातपासून शांततेत सुरू झालेली प्रक्रिया सायंकाळी सहापर्यंत तशीच आणि सुरळीत पार पडली. प्रशासनाने पाचपर्यंत ५८.३९ एवढी मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली. शेवटच्या एका तासात आणि त्यानंतर उर्वरित झालेल्या मतदानाची आकडेवारी ६५ टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अधिकृत आकडेवारी शुक्रवारीच जाहीर होऊ शकते. 

लातूरला अनेक केंद्र लक्षवेधी
लातूर - लातूर मतदारसंघात उत्साहात मतदान झाले. लोकशाहीच्या या उत्सवात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५६.६८ टक्के मतदान झाले. भाजपचे सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्यासह दहा जणांचे भवितव्य यंत्रबंद झाले. शेवटच्या एका तासात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी राहिली. त्यामुळे हे मतदान ६५ टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठांसाठी सुविधा, चिमुकल्यांसाठी बालसंगोपन केंद्र, महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सखी, तर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सक्षम मतदान केंद्र सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला. अनेक मतदान केंद्र रांगोळ्या काढून, फुलांनी सजवली गेली होती. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवाला मंगलमय सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

उस्मानाबाद - किरकोळ प्रकार वगळता उस्मानाबाद मतदारसंघात शांततेत मतदार झाले. मतदारांची नावे गायब होणे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची शिवसैनिकांसोबत बाचाबाची, तीन गावांचा मतदानावर बहिष्कार अन्‌ गुप्त मतदान पद्धतीचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल आदी बाबींमुळे मतदान प्रक्रिया चर्चेत राहिली. सायंकाळी सहापर्यंत मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात सरळ सामना असलेल्या या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 percent polling in six constituencies in Marathwada