Loksabha 2019 : हिंगोलीत निकृष्ट भोजनाने कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप

मंगेश शेवाळकर
बुधवार, 17 एप्रिल 2019

  • तेलकट व तिखट पदार्थांनी अनेकांचा काढता पाय
  • अनेकांना उपाशीपोटीच मतदान केंद्रावर जावे लागले
  • अनेकांचा शासकीय तंत्रनिकेतन येथील भोजन न घेताच काढता पाय

लोकसभा 2019
हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले भोजन निकृष्ट दर्जाच्‍या असल्‍याच्या तक्रारी करत कर्मचाऱ्यांनी भोजन न घेणे पसंत केले. या भोजनामुळे कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्‍त करण्यात आला आहे. 

हिंगोली विधानसभा मतदारसंघात सुमारे 342 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या केंद्रांवर सुमारे दोन हजार कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आज सकाळी या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्‍य घेवून मतदान केंद्रावर जाण्यासाठी बोलावण्यात आले. सकाळी सात वाजता कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतन येथे हजर झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्‍य दिल्‍यानंतर भोजन देण्यात आले. मात्र भोजनाचा दर्जा निकृष्ट असल्‍याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. भोजनामध्ये वरण, भात, सोयाबीन वडी व शिरा आदी पदार्थ देण्यात आले. मात्र अतिशय तेलकट व तिखट असलेले वरण, सोयाबीन वडी दिल्‍याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. तर कर्मचाऱ्यांसाठी भोजनाबाबत अंदाज न आल्‍यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे भोजन होण्यापूर्वीच स्‍वयंपाक संपून गेला. त्‍यामुळे अनेकांना उपाशीपोटीच मतदान केंद्रावर जावे लागल्‍याची चर्चा सुरु होती. याबाबत तक्रारी सुरु झाल्‍यानंतर तातडीने पोळ्या व इतर पदार्थ तयार केले जात होते. निकृष्ट भोजनामुळे प्रकृती बिघडल्‍यास मतदान केंद्रावर मतदान कसे पार पाडावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला होता. त्‍यामुळे अनेकांनी शासकीय तंत्रनिकेतन येथील भोजन न घेताच काढता पाय घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेल्‍या निकृष्ट भोजनामुळे कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात होता. या संदर्भात अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍याशी संपर्क होवू शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anger against management for the worst food giving to election employees in Hingoli