Loksabha 2019 : मोदी म्हणजे ‘फेकू नंबर वन’ - सिद्धू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

‘कुली नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ असे चित्रपट आले, आता मोदींचा चित्रपट येतोय ‘फेकू नंबर वन.’ जहीर खान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली.

औरंगाबाद - ‘कुली नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ असे चित्रपट आले, आता मोदींचा चित्रपट येतोय ‘फेकू नंबर वन.’ जहीर खान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. मोदींनी ३७० आश्‍वासने दिली, त्यापैकी किती पूर्ण केली, हे त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावे, मी हरलो तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान सिद्धू यांनी दिले. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ किराडपुरा भागात शनिवारी सिद्धू यांची सभा झाली. या वेळी त्यांनी ‘भाई और बहनों...’ असे म्हणत मोदींची खिल्ली उडवली. मोदी यांनी ३७० आश्‍वासने दिली होती. तुम्हाला दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या का? गंगा साफ झाली का? १५ लाख रुपये तुमच्या खात्यात आले का? काळे धन आले का? असे प्रश्‍न करीत त्यांनी तुम्हाला काय मिळाले ‘बाबाजी का ठुल्लू’, अशी टीका केली. ‘बात करोडो की, दुकान पकोडे की और संगत भगौडो की’ असे पंतप्रधानांचे काम असून, नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात हाहाकार माजला आहे. त्यामुळे एकजुटीने मतदान करा, असे आवाहन सिद्धू यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Navjot Singh Sidhu Politics