मराठवाडा - चव्हाण, खैरेंना पराभव धडा

संजय वरकड
शुक्रवार, 24 मे 2019

मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे.

मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे.

शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील काँग्रेसच्या पुढील वाटचालीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

चव्हाण यांना रिंगणात उतरवण्याऐवजी प्रदेशाध्यक्षपदाच्या कामासाठी वेळ दिला असता तर कदाचित काँग्रेसवर ही वेळ आली नसती. अर्थात, रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्यासारख्या दिग्गजाने विजयी होणे अपेक्षित होते.

त्यांच्याप्रमाणेच इतरही निकालांनी भल्याभल्यांचे अंदाज चुकवल्याने ही निवडणूक संस्मरणीय राहील. राज्यभरात बहुजन वंचित आघाडीने चांगली मते मिळवलीत. काँग्रेसने या सर्व घटकांकडे तितकेसे गांभीर्याने बघितले नाही, म्हणूनच यशपाल भिंगेंसारख्या तरुणाने नांदेडमध्ये चव्हाणांची कोंडी केली. औरंगाबादमधून सलग पाचव्यांदा विजयाने मोदी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेना आणि भाजपला चांगलाच भोवला. गटबाजी आणि वादामुळे विस्कळित प्रचाराला यश मिळाले नाही. त्यातच काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्याने ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील आणि खैरे यांच्यात शेवटपर्यंत झुंज झाली.

अर्थात, यात केवळ एका फेरीचा अपवाद वगळता जलील यांनी अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवली. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी धडाडीने रिंगणात उडी घेत तीन लाखांच्या जवळपास पोचले. त्यांच्या उमेदवारीविषयी पूर्वी आणि पुढेही चर्चा होतच राहील. त्यांनी खैरेंना पाडले, की जलील यांना निवडून आणले, यावर चर्चा होतील. त्यांना आता फारसा अर्थ नाही. जलील यांच्याविषयी बिगरमुस्लिम मतदारांमध्येही खूप चांगले मत आहे. त्याचाच फायदा त्यांना झाला. 

अपेक्षेप्रमाणे लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे यांनी सहजपणे बाजी मारली. बीड लोकसभा मतदारसंघात खूप चुरशीची चर्चा होती. प्रत्यक्षात पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी सहजपणे ही निवडणूक जिंकली. उस्मानाबाद मतदारसंघात सुरवातीला राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांचे पारडे जड होते. अखेरच्या टप्प्यात सर्वच मतदारसंघांत ग्रामीण भागात मोदींच्या बाजूने मतदार झुकल्याचे वरवर दिसते आहे. त्याचा फायदा शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांना नक्कीच झाला. हिंगोलीमधून राजीव सातव यांनी स्वतःऐवजी ॲड. शिवाजी वानखेडेंना मैदानात आणले. शिवसेनेचे हेमंत पाटील बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार झाला, त्याचा फारसा फायदा वानखेडेंना झाला नाही. परभणीतही राष्ट्रवादीचे राजेश विटेकर शिवसेनेचे संजय जाधवांवरील नाराजीचा फायदा उठवतील, असे दिसत होते.

मात्र, मराठवाड्यात हिंदुत्ववादाच्या बाजूने, अर्थातच मोदींच्या बाजूनेच मतदान झाले. औरंगाबादला खैरे आणि जाधव यांना झालेले मतदान कुणीही आले तरी मोदींनाच पाठिंबा देतील यामुळेच झाले. लोकसभेत शिवसेनेची व्होट बॅंक पहिल्यांदाच दुभंगली असे नाही. यापूर्वी शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीतूनही असे घडले होते. औरंगाबाद वगळता सात जागा जिंकून युतीने पुन्हा मराठवाड्यातील शक्तिस्थान सिद्ध केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Marathwada Ashok Chavan Chandrakant Khaire Defeat Politics