Loksabha 2019 : पेड न्यूज प्रकरणी प्रितम मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

बीड : लोकसभा निवडणूकीत बीड मतदार संघातून निवडणुक लढलेल्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मंगळवारी (ता. 24) नोटीसा बजावण्यात आला. पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी या नोटीसा बजावल्या आहेत.

दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारादरम्यान वृत्तपत्रे व माध्यमांद्वारे प्रचारासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे नोटीसांत म्हटले आहे.
 
बीड लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राज्यात चर्चेची ठरली. दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर ताकद आणि प्रतिष्ठा लावली होती. शेवटच्या टप्प्यात विविध अस्त्रांचा वापर दोन्ही पक्षांनी केला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बीड लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये अनधिकृतरित्या वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार निवडणूक विभागास प्राप्त झाली. तर, दैनिकांमध्ये ही जाहीरात प्रसिद्ध झाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांनी एका दैनिकात ता. 17 एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरुन तक्रार करणारा अर्ज निवडणूक कार्यालयास प्राप्त झाला होता.

दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नोटीसा बजावल्या आहेत. आपले म्हणणे सादर करण्याच्या सुचना नोटीसीत दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Pritam Munde and Bajrang Sonvaneen for Paid News issue