esakal | Election Results : बहुजन आघाडीने कॉंग्रेसला केले 'वंचित'; पहिल्यांदाच डिपॉझिटही जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Election Results : बहुजन आघाडीने कॉंग्रेसला केले 'वंचित'; पहिल्यांदाच डिपॉझिटही जप्त

दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी लाखभर मतेदेखील घेता आली नाहीत. केवळ 91 हजार 789 मते घेणारे कॉंग्रेस उमेदवार आमदार सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Election Results : बहुजन आघाडीने कॉंग्रेसला केले 'वंचित'; पहिल्यांदाच डिपॉझिटही जप्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोकसभा निकाल 2019
औरंगाबाद ः लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. विजयश्री खेचून आणताना त्यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी लाखभर मतेदेखील घेता आली नाहीत. केवळ 91 हजार 789 मते घेणारे कॉंग्रेस उमेदवार आमदार सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

गतवेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात कॉंग्रेसची पुन्हा एकदा बिकट अवस्था झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच काॅँग्रेस उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त झाले आहे.

औरंगाबाद मतदारसंघात तीन आमदार व विद्यमान खासदार असे तगडे उमेदवार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रत्यक्ष निकाल जाहीर होईपर्यंत ही चुरस कायम होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली; मात्र कधी अपक्ष उमेदवार आमदार हर्षवर्धन जाधव, तर कधी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचे पुढे-मागे सुरू होते. 

कधीकाळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता; मात्र शिवसेनेने हा किल्ला खिळखिळा करीत जिल्ह्यावर वर्चस्व मिळविले. असे असले, तरी लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काही अपवाद वगळता कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळत राहिली. या वेळी कॉंग्रेसचा उमेदवार थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. एवढेच नाही, तर सुभाष झांबड यांचे डिपॉझिटही जप्त झाले. खरेतर कॉंग्रेसने संघर्ष यात्रा काढून जिल्ह्यात सुरवातीपासून मोर्चेबांधणी केली होती; मात्र उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून गटबाजी सुरू झाली.

झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षात धुसफूस सुरू होती. तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड करीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले. त्याचे परिणाम मतपेटीतूनही दिसून आले. श्री. झांबड यांना केवळ 7.66 टक्के एवढेच मतदान झाले.  त्यापेक्षा जास्त मतदान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख 83 हजार 798 एवढे म्हणजे 23.68 एवढे झाले आहे. या निवडणुकीत नवाच प्रयोग असलेल्या वंचित बहुजन आघाडीने मात्र कॉंग्रेसला दलित-मुस्लिमांच्या मतांपासून वंचित केले आहे. 

विधानसभा अवघडच 
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेली मते पाहता तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक कॉंग्रेसला सोपी नाही, हाच संकेत मिळत आहे.

loading image