Vidhansabha 2019 : विद्यमान आमदारांकडून मोर्चेबांधणी सुरू

भास्कर बलखंडे
गुरुवार, 9 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • आघाडी, युती कायम राहिल्यास जागावाटपावरून संघर्ष 
  • गेल्या निवडणुकीतील भाजपच्या जागेवर शिवसेना दावा करणार
  • काँग्रेस-राष्ट्रवादीमधील इच्छुकांतही वादाची शक्‍यता
  • तिकीट न मिळाल्यास इच्छुकांचा हिरमोड होणार

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी झाल्याने पूर्वीच्या जागा सोडवून घेताना संघर्षाची ठिणगी पडू शकते.

लोकसभेच्या जालना मतदारसंघात विधानसभेच्या जालना, भोकरदन, बदनापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण मतदारसंघांचा समावेश होतो. विधानसभेसाठी जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, परतूर आणि घनसावंगी या पाच क्षेत्रांचा समावेश होतो. या मतदारसंघात ३२ टक्के मराठा, २० टक्के दलित, २२ टक्के मुस्लिम, ६ टक्के उत्तर भारतीयांसह धनगर, कुणबी, जैन, गुजराथी; तर अन्य समाज २० टक्के आहे. प्रामुख्याने मराठा, मुस्लिम आणि दलित या तीन घटक मतदारांवर प्रभाव पाडणारे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून साऱ्याच राजकीय पक्षांना विधानसभा खुणावत आहे. त्यानुसार प्रचारात नियोजन झाले. इच्छुकही सक्रिय झाले. 

जालन्यात शिवसेनेतर्फे राज्यमंत्री अर्जुन खोतकर; तर काँग्रेसतर्फे माजी आमदार कैलास गोरंट्याल प्रमुख दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीत खोतकर यांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर हेही इच्छुक मानले जातात. ऐनवेळी ते रिंगणात उतरू शकतात. खोतकर यांनी लोकसभेच्या प्रचारानिमित्त मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याचाही मोठा फायदा त्यांना मिळू शकतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे गोरंट्याल यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अब्दुल रशिद ‘राष्ट्रवादी’कडून दावेदार असू शकतात. बहुजन वंचित आघाडीतर्फे दीपक डोके रिंगणात उतरू शकतात.

बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपतर्फे आमदार नारायण कुचे, ‘राष्ट्रवादी’तर्फे बबलू चौधरी, बाबासाहेब सोनवणे, सुरेश खंडागळे आदी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार संतोष सांबरे, जगन दुर्गे, डॉ. दिलीप अर्जुने इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले आहेत. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. गेल्यावेळी युती नव्हती. भाजपचे आमदार नारायण कुचे विजयी झाले होते.

आता या जागेवर शिवसेना दावा करू शकते. इतर विधानसभा मतदारसंघांतही हिच स्थिती असू शकते. वंचित आघाडीतर्फे ऐनवेळी येथे उमेदवार दिला जाऊ शकतो. ‘मनसे’कडून अमोल दाभाडे आणि ॲड. मोहन तायडे इच्छुक आहेत.

भोकरदनमध्ये भाजपतर्फे संतोष दानवे, काँग्रेसकडून सुरेश गवळी; तर ‘राष्ट्रवादी’कडून चंद्रकांत दानवे रिंगणात उतरतील. शिवसेनेकडून रमेश गव्हाड दावा सांगू शकतात. घनसावंगी मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’कडून माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेतर्फे हिकमत उढाण रिंगणात उतरतील.

जागावाटपावरून मतभेद झाल्यास भाजपच्या वतीने ॲड. विश्वजित खरात हेही दावा करू शकतात. बहुजन वंचित आघाडी शिवाजी चौथेंना आपल्याकडे आकर्षित करू शकते. परतूर मतदारसंघात भाजपकडून मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसच्या वतीने माजी सुरेश जेथलिया रिंगणात उतरतील. ही जागा युतीत भाजपकडे आहे. दोन्ही पक्षांत ही जागा सोडवून घेताना पेच होऊ शकतो. शिवसेनेतर्फे ए. जे. बोराडे दावेदार आहेत. काँग्रेसकडून कदिर बापू देशमुख किंवा धोंडिराम राठोड रिंगणात उतरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Jalana Constituency MLA Planning Politics