Loksabha 2019 : नांदेडामध्ये लोकशाहीच्या उत्सवात अकरा लाखावर मतदारांचा सहभाग

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

  • नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्के मतदान
  • २०१४च्या तुलनेमध्ये पाच टक्क्याने वाढ ​

लोकसभा 2019 
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड लोकसभा
मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या
या लोकशाहीच्या या उत्सवात १७ लाख १७ हजार ८३० मतदारांपैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघामध्ये एकूण मतदान ६५.१५ टक्के झाले. 

यंदा २०१४ च्या तुलनेमध्ये पाच टक्क्याने वाढ झाली आहे. यंदा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. ‘मी मतदान करणार’
स्वाक्षरी मोहीम, मतदानाविषयीची प्रबोधन फेरी, ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले होते. शिवाय सोशल मिडियावरही जनजागृती करण्यात आली. एवढे करूनही मात्र मतदारांमध्ये उत्साह दिसला नसल्याचे टक्केवारीवरून दिसत आहे. एकूण मतदारांपैकी पाच लाख ९८ हजार ७१४ मतदारांनी मतदान केले नसल्याचे सार्वत्रिक निवडणूक विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

यंदा प्रथमच निवडणुकीत ज्येष्ठांसाठी सुविधा, चिमुकल्यांसाठी बाल संगोपन केंद्र, महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सखी, आदर्श तर दिव्यांग
कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सक्षम मतदान केंद्र सर्वांना उत्सुक्तेचा विषय
ठरला. अनेक मतदान केंद्रात रांगोळ्या काढून, फुलांनी सजवली गेली होती. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवाला मंगलमय सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.

नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार २८ मतदान केंद्रावर हे मतदान झाले. मशीन यंत्र बंद पडण्याचे तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. या मतदार संघात ६५.१५ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ७०.७१ टक्के मतदान हे भोकर विधानसभा मतदारसंघात झाले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ६४.१७ टक्के, नांदेड उत्तर मतदारसंघात ६२.७३, नायगाव ६९.७९, देगलूर ६३.३१, मुखेड मतदारसंघात ६०.४८ टक्के मतदान झाले आहे. या मतदानात एकूण १७ लाख १७ हजार ८३० मतदारांपैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदाराची संख्या पाच लाख ९४ हजार ६१४ तर महिला मतदाराची संख्या पाच लाख २४ हजार ४९० आणि इतर १२ इतकी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter participation in Eleventh Lakh in the loksabha election 2019 at nanded