Loksabha 2019 : भाजपला चिंता शिवसेनेच्या कामगिरीची

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 17 एप्रिल 2019

पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या यवतमाळबाबतही भाजपने चिंता व्यक्‍त करीत वेळीच सावध केले होते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मिलिंद देवरा यांच्या, तर उत्तर पश्‍चिम हे क्षेत्र संजय निरूपम यांच्या प्रवेशामुळे काहीसे काळजीचे आहेत, असे कळवण्यात आले आहे.

23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण
मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची भीती भाजपला असल्याचे समजते. परभणी, बुलडाणा, रायगड, शिरूर या राष्ट्रवादी कॉंग्रेस समोरच्या, तर हिंगोली आणि शिर्डी या कॉंग्रेस समोरच्या जागा युतीसमोरचे आव्हान असल्याची माहिती समोर येते आहे.

पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या यवतमाळबाबतही भाजपने चिंता व्यक्‍त करीत वेळीच सावध केले होते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मिलिंद देवरा यांच्या, तर उत्तर पश्‍चिम हे क्षेत्र संजय निरूपम यांच्या प्रवेशामुळे काहीसे काळजीचे आहेत, असे कळवण्यात आले आहे. बुलडाणा, अमरावती या विदर्भातील मतदारसंघांत भाजपने आपली कार्यकर्त्यांची यंत्रणा शिवसेना उमेदवारांसाठी उभी केली.

शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांनी या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रचारसाहित्यात मोदी यांची छायाचित्रे मोठी आहेत. या वेळी मोदी यांच्याच नावे मते मागितली जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप लढत असलेल्या मतदारसंघात शांत आहेत. युतीतील कार्यकर्त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण नाहीत तेथे शिवसैनिक काम करत नाहीत, असेही सांगण्यात येते.

आता झाले ते विसरून शिवसेनेने ते लढत असलेल्या मतदारसंघांकडे अधिक लक्ष द्यावे, असा निरोप पाठवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कार्यकर्त्यांनी कळवले आहे.
शिवसेना लढत असलेल्या 23 पैकी तब्बल 21 मतदारसंघांत जिंकणे शक्‍य असल्याचे भाजपला वाटते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेचा एकही "स्टार प्रचारक' या निवडणुकीत सक्रिय झालेला नाही. अर्थकारणातही शिवसेनेने हातचे राखणे पसंत केले असल्याची भावना भाजपचे कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभा निवडणुकीत कमालीच्या ताकदीने उतरली आहे. शिवसेनेचा त्यांच्याशी जेथे सामना आहे तेथे निवडणूक चुरशीची झाली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Shivsena Politics