‘लाट’ ओसरल्याने ‘वाट’ बिकट!

दीपा कदम
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

‘मोदी लाट’ आणि ‘युती’ अशा दुहेरी लाभामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर २०१४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकवत काँग्रेसला ‘हात’ दाखवला. या वेळी पुन्हा युती झाली असली, तरी ‘लाट’ ओसरल्यामुळे मतांचा खड्डा पडणार नाही, याची काळजी शिवसेनेला अधिक घ्यावी लागणार आहे. 

‘मोदी लाट’ आणि ‘युती’ अशा दुहेरी लाभामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर २०१४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकवत काँग्रेसला ‘हात’ दाखवला. या वेळी पुन्हा युती झाली असली, तरी ‘लाट’ ओसरल्यामुळे मतांचा खड्डा पडणार नाही, याची काळजी शिवसेनेला अधिक घ्यावी लागणार आहे. 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. त्या वेळी त्यांना अडीच लाखांहून अधिक मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत गायकवाड यांची मते केवळ १५ हजारांनी कमी झाली होती. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी तीन लाखांहून अधिक मते घेतली. मोदी लाटेतही काँग्रेसच्या पारंपरिक मतांना या मतदारसंघात फारसा धक्का लागला नव्हता. नव मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडल्याने शिवसेनेला येथे विजय मिळवता आला. हेच चित्र आगामी निवडणुकीत कायम राहावे, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार, हे निश्‍चित असले, तरी पूर्वीची मोदी लाट ओसरल्याने शेवाळेंसाठी ही लढत सोपी राहिलेली नसल्याचे दिसते.

रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपने याबाबत ‘मातोश्री’च्या दिशेने बोट दाखवल्याने आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यास सुरवात केली आहे. ‘एनडीए’चे सरकार आल्यास कॅबिनेट मंत्रिपद आणि विधानसभेसाठी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीनेच आठवलेंचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात आठवले रिंगणात नसतील, हे निश्‍चित.

मुंबई महापालिकेत तीन वेळा राहिलेल्या शेवाळेंचा खासदार झाल्यानंतर जनसंपर्क कमी झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. खासदारकीच्या फक्त पहिल्या वर्षी त्यांनी मतदारसंघात चांगले लक्ष दिले होते. त्यानंतर सहा महिन्यांपासून ते पुन्हा दिसू लागले. त्यांनी स्वतःची वाट बिकट करून ठेवली, अशी चर्चा आहे. काँग्रेसतर्फे पुन्हा एकनाथ गायकवाड रिंगणात उतरण्याची शक्‍यता वर्तवली जात असतानाच, त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच, यापूर्वी राज्यसभेवर गेलेले भालचंद्र मुणगेकर यांनीही उमदेवारीसाठी दिल्लीपर्यंत ‘लॉबिंग’ केले आहे.

मतदारांमधील नाराजीची कारणे 
    सायन, चेंबूर परिसरातील रिफायनरीमुळे वायू प्रदूषण
    खारजमीन, बीपीटी, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण
    जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींमधील रहिवाशांचा प्रश्‍न
    देवनार क्षेपणभूमीचे शास्त्रोक्त पुनर्भरण झालेले नाही
    धारावीचा पुनर्विकास रखडलेलाच

२०१४ मधील मतविभाजन 
    राहुल शेवाळे (शिवसेना) - ३,८१,००८ (विजयी)
    एकनाथ गायकवाड (काँग्रेस) - २,४२,८२८ 
    आदित्य शिरोडकर (मनसे) - ७३,०९६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi BJP Shivsena Congress Politics