Loksabha 2019 : युती-आघाडीमध्ये तुल्यबळ लढत

दीपा कदम
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न

  • अणुशक्‍तीनगर, चेंबूर, माहुल, प्रतीक्षानगर भागात रासायनिक प्रदूषणाने नागरिक हैराण
  • धारावी झोपडपट्टीसोबत इतर झोपडपट्ट्यांचे रखडलेले पुनर्वसन
  • नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास
  • कोळीवाड्यांचा पुनर्विकास 

जिथे शिवसेनेची स्थापना झाली आणि प्रदीर्घ काळ तो गड शिवसेनेने राखला, त्या संपूर्ण दादर परिसराचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा बाज धारावी या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीमुळे बदलून गेलाय. मध्यमवर्गीय दादरकर विरुद्ध हातावर पोट असलेले धारावीकर यांच्यातील संघर्षात हा मतदारसंघ शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे राखणार, की काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याची किमया करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंनी प्रचाराचा धडाका लावलेला असताना काँग्रेसचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाडांनी लहान गटसभा घेत मतदारांशी संवादावर भर दिला आहे. शेवाळेंच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीमध्ये येऊन सभादेखील घेतली. मात्र, एकनाथ गायकवाडांच्या प्रचारासाठी अद्याप पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा एकही नेता फिरकलेला नाही. या मतदारसंघातल्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गायकवाडांचा प्रचार कायम असाच संयत असतो. त्यांच्या प्रचारात भडकपणा नसतो, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेचे नेते आणि लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशींचाही २००४ मध्ये गायकवाडांनी पराभव केला होता, याची आठवण या मतदारसंघात काढली जाते. (मतदारसंघ पुनर्रचनेत २००४ मध्ये उत्तर मध्य मुंबई असा हा मतदारसंघ होता.)

युतीसाठी काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघड प्रचार सुरू केल्याने एकनाथ गायकवाड नाराज आहेत. शिवाय, स्थानिक शिवसैनिकदेखील कोळंबकरांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारावे लागणार म्हणून नाराज असल्यानेच कोळंबकरांनाही भाजपचा हात धरावा लागतोय. या मतदारसंघात माहीम विधानसभा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावतो.

शिवाजी पार्क, माहीमचा मध्यमवर्ग आणि त्यालाच लागून माटुंगा लेबर कॅम्प झोपडपट्टीचा भाग आहे. या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची मदार टिकून असेल. शिवसेनेच्या या मतदारांना रोखण्यास मनसे काय भूमिका बजावते किंवा ‘मनसे’च्या पारड्यातली काही टक्‍के मते तरी ते काँग्रेसकडे वळवू शकतात का, यावर गायकवाडांची भिस्त टिकणार आहे.

अद्याप तरी या मतदारसंघात ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या प्रचारात उडी घेतलेली नसल्याने प्रचारात रंगत आलेली नाही; मात्र या वेळी या मतदारसंघासाठी युती आणि आघाडीच्या उमेदवारांसाठी ही लढाई एकतर्फी नसेल, हे मात्र निश्‍चित.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Yuti Aghadi Politics South Central Mumbai Constituency