Election Results : मुंबईत शिवसेना-भाजपचेच वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एक्‍झिट पोलच्या अंदाजानंतर तर सर्वांचेच कुतूहल वाढले आहे. अभ्यासकांच्या मतानुसार गुरुवारी (ता. २३) दुपारचा चहा होईपर्यंत मुंबईतील चित्र स्पष्ट होणार आहे.

मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी आणि त्यानंतरचे सोपस्कर संपण्यासाठी रात्र उजाडणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार लॉटरी काढून पाच व्हीव्हीपॅट मशीनमध्ये नोंद असलेल्या मतांची नोंदणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजपला 3 आणि शिवसेनेला 3 तीन जागांवर आघाडी आहे.

मुंबईत भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत थेट लढाई होत आहे. मनसेने महायुतीचे आणि वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मतांचे गणित चुकवले आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. सकाळी ठीक आठ वाजल्यापासून टपाली मतमोजणीने सुरुवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघानुसार मतमोजणीच्या किमान १८ ते २५ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. दहाव्या फेरीनंतर मुंबईतील चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती एका अभ्यासकाने दिली.

उमेदवार प्रत्येक फेरीनुसार प्रक्रियेवर आक्षेप घेऊ शकतो किंवा संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्याला आक्षेप घेता येईल. एखाद्या वेळेस अटीतटीच्या लढाईतच मतमोजणीला विलंब होऊ शकतो. मात्र, तशी शक्‍यता मुंबईत कमीच आहे. उमेदवारांनी आक्षेप घेतले तरच प्रक्रिया लांबू शकते. अन्यथा दुपारी तीन-चार वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊन संध्याकाळी सात-आठपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

अशी होणार मतमोजणी 
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी  १४ टेबलनिहाय आराखडा 
प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहायक 
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर प्रथम पोस्टाच्या मतांची मोजणी
विधानसभा मतदारसंघानुसार पाच व्हीव्हीपॅट मशीनची क्रमाक्रमाने मोजणी. त्याकरिता स्वतंत्र टेबल 
मतमोजणीच्या १८ ते २५ फेऱ्या 
सकाळी ८ वाजता पोस्टल मतदान आणि  ८.३० वा. सामान्य मतदारांची मतमोजणी
व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी झाल्यानंतर   निकाल जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai loksabha election 2019 picture is clear till afternoon