Loksabha 2019 : 'शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

  • शिक्षण मंत्री विनोद तावडेंची शरद पवारांच्या भाषेवर टीका
  • 'सुप्रिया सुळेंचे बारामतीत खरे नाही'
  • 'आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदींचे नेतृत्व निवडा'

लोकसभा 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

शरद पवार यांच्या प्रचाराच्या भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आज उत्तर देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, शरद पवार सध्या बुथ वरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर या प्रकारची भाषा वापरत आहेत, याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही. हे बहुधा त्यांना कळले असावे, असा टोलाही त्यांनी मारला.

शरद पवार यांच्या मुलीचे काय होईल, अजितदादांच्या मुलाचे काय होईल ? मुलायम सिंह यांच्या मुलाचे काय होईल ? याचा विचार करु नका, तर आपल्या मुला बाळांचे काय होईल याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करुन लोकांनी मतदान कराव असे आवाहन करताना, या राजकीय नेत्यांनी आपा-आपल्या मुला-बाळांसाठी भरपुर संपत्ती गोळा करुन ठेवलीय. त्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिल पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या भाषणांचा राजकीय परिणाम निवडणूकीत काहीही होणार नाही. त्यांच्या भाषणातून फक्त सर्वांची चांगली करमणूक होत आहे. लाव रे व्हिडीओ... असे सांगत आता लोक सोशल मिडीयावर व्हिडीओ लावत आहेत. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना कसे टेम्पो धुणारे म्हटले होत व त्यांची नक्कल केली होती, छगन भुजबळ यांच्यावर कशी टिका केली होती. शरद पवार यांच्याबद्दल आधी काय भाष्य केले होते. हे सगळे मनसेचे व्हिडीयो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत, याकडेही तावडे यांनी यावेळी लक्ष वेधले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President Sharad Pawars promotional language for loksabha election goes lower level