Loksabha 2019 : मनसेच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवीत नसल्याचे कारण देऊन राज ठाकरे यांच्या 24 एप्रिलच्या काळाचौकी येथील सभेला एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवीत नसल्याचे कारण देऊन राज ठाकरे यांच्या 24 एप्रिलच्या काळाचौकी येथील सभेला एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही. त्यामुळे मनसेला याबाबत महापालिका, पोलिस, अग्निशामन दल आदींकडूनच परवानग्या घ्याव्या लागतील. 

अभ्यूदय नगरच्या शहीद भगतसिंह मैदानात 23 किंवा 24 एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मनसेमार्फत शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने उघडलेल्या एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ही एक खिडकी योजना केवळ लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आहे. पण मनसे निवडणुक लढवीत नसल्याने या जाहीर सभेसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत परवानगी देता येणार नाही.

त्यामुळे या अर्जावर स्थानिक प्राधिकरणाकडूनच (महापालिका) परवानगी मिळणे अपेक्षित आहे, असे लेखी उत्तर समन्वयक अधिकारी जितेंद्र भोपळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता मनसे ला या सभेसाठी नेहमीच्या पद्धतीनुसार महापालिका, अग्निशामन दल, पोलिस आदींकडून परवानग्या घ्याव्या लागतील. आता सोमवार व मंगळवार या दोन कामाच्या दिवसांमध्ये या सर्व परवानग्या घेण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission of MNS rally denies from BMC