Loksabha 2019 : उन्हाचा चटका, मतदानाला फटका

Loksabha 2019  :   उन्हाचा चटका, मतदानाला फटका

ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान प्रक्रियेची सुरुवातच संथगतीने झाली असली, तरी उन्हाचा चटका चुकविण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परंतु, संथगतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे मतदारांना तासनतास घामाची टीपे गाळत उभे राहावे लागले. गर्दी आणि उन्हाच्या झळा सहन न झाल्याने काही जण मतदान न करताच माघारी फिरले. काहींनी मात्र भर उन्हातही उभे राहत आपला हक्क बजावला. तरुणांसोबत ज्येष्ठांचीही उपस्थिती केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होती. उच्चभ्रू वस्तीत मात्र नेहमीप्रमाणे केंद्रावर मतदारांची मोजकीच उपस्थिती जाणवली. 

ठाणे शहरात सकाळपासूनच मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. उन्हाचा त्रास चुकविण्यासाठी मतदारांनी सकाळी लवकर जाऊनच मतदान करण्याचा निर्णय घेतला; परंतु मतदान केंद्रावर पोहोचताच नाव शोधताना निवडणूक अधिकाऱ्यांचाच उडणारा गोंधळ, चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतरही ईव्हीएम मशीनचा न होणारा आवाज, व्हीव्हीपॅट पावतीसाठी होणारा विलंब यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू होती. एका व्यक्तीला मत नोंदवण्यासाठी दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागत होता. तर काही ठिकाणी मतदारांची ओळख तपासताना त्रुटी येत असल्याने जास्त विलंब होत होता. परिणामी, लोकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागले होते. मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींना केंद्रात घेऊन जाण्यासाठी खास कर्मचाऱ्यांची, व्हीलचेअरची सुविधा करण्यात आली होती. तसेच, त्यांना घरपोच येण्या-जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा अनेक मतदारांनी लाभ घेत मतदान केले. श्रीरंग शाळा, गोकुळनगर येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या तीन तीन रांगा करण्यात आल्या होत्या. यामुळे खोली क्रमांक शोधताना मतदारांचा गोंधळ उडत होता. वर्तकनगर परिसरातील उच्चभ्रू वस्तीतील केंद्रावर मतदारांची उपस्थिती तुरळक होती. दुपारी २ नंतर उन्हाचा चटका जाणवू लागल्याने; तसेच केंद्रावरील गर्दी पाहून मतदारांनी मतदान न करताच माघारी फिरत घरात बसणे पसंत केले. 

संध्याकाळी पुन्हा रांग 
सायंकाळी ४ नंतर कार्यकर्त्यांनीच मतदारांची भेट घेत त्यांना घराबाहेर पडा, असे सांगत मतदान करण्यासाठी गळ घालू लागले. यामुळे पाचच्या दरम्यान पुन्हा मतदान केंद्रावर नागरिकांची रिघ लागण्यास सुरुवात झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com