Loksabha 2019: भाजपमधील सासऱ्याला राष्ट्रवादीतील जावयाची ओढ

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 एप्रिल 2019

आमदार कर्डिले सध्या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यांनीही जावयासाठी पक्षीय राजकारण थोडे बाजूला ठेवावे, असा आग्रह त्यांना कार्यकर्ते करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

नगर : "कॉंग्रेसचे 'ते' स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते असूनही मुलगा भाजपमध्ये आल्याने त्याच्यासाठी उघडपणे कमळाचा प्रचार करतात. मग आम्ही आमच्या जावयासाठी प्रचार केल्यास बिघडले कुठे?," असा सवाल उपस्थित करत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी आज उघडपणे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा पवित्रा घेतला. 

आमदार कर्डिले सध्या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यांनीही जावयासाठी पक्षीय राजकारण थोडे बाजूला ठेवावे, असा आग्रह त्यांना कार्यकर्ते करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप व शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्तेही उघडपणे सहभागी झाले.

त्यात खास करून आमदार कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब दरेकर होते. आमदार राहुल जगताप, प्रताप शेळके, रोहिदास कर्डिले, केशव बेरड, किसन लोटके, संपतराव म्हस्के यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या मेळाव्यात आमदार जगताप म्हणाले, "देशात शेतकरीहिताचे धोरण राबविण्याची गरज असताना मोदी सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यानेच आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. मात्र, त्याविषयीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याऐवजी हे शहीद जवानांच्या नावावर मते मागून मूळ प्रश्‍नांना बगल देत आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp MLA shivajirao kardile Supports ncp Candidate Sangram Jagtap