Loksabha 2019 : मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

शरद पवार यांच्या विचारांचा खासदार गेल्यावेळी मोदी लाटेतही कोल्हापुरातून पाठविला. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांच्यासारखा नेता पाठीशी असल्याने मी अनेक प्रश्‍न उपस्थित करू शकलो. विकासाच्या प्रकल्पांसाठी संघर्ष केला.

कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींची लाट होती. ती लाट कोल्हापुरात थोपवली गेली. तुमच्या विचारांचा खासदार, पवारांच्या विचारांचा खासदार म्हणून मी दिल्लीत गेलो. तेथे गेल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित केले. सुप्रियाताई सुळे व मी सर्वांत जास्त प्रश्‍न विचारले. यामुळे मला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले. मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही. आमचे विरोधी उमेदवार हे त्यांचे वडील खासदार होते, म्हणून मलाही खासदार करा, असे सांगतात. त्यांना नाकारा, असे आवाहन करून ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरचे लोक कर्तृत्ववान व्यक्तिच्या पाठीशी राहतात. ही सभा संपल्यानंतर कार्यकर्ते दहा हत्तीचे बळ घेऊन कामाला लागतील. शरद पवार यांच्या विचारांचा खासदार गेल्यावेळी मोदी लाटेतही कोल्हापुरातून पाठविला. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांच्यासारखा नेता पाठीशी असल्याने मी अनेक प्रश्‍न उपस्थित करू शकलो. विकासाच्या प्रकल्पांसाठी संघर्ष केला. बास्केट ब्रीजसाठी १७० कोटी रुपये मंजूर झाले. ही निवडणूक महागाई, बेरोजगारी अशा प्रश्‍नावर लढली गेली पाहिजे. पवार यांनी साखर कारखानदारीला बळ दिले. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतीसंबंधित उद्योगाला बळ देण्यापेक्षा अन्य उद्योगांना पॅकेज दिले’’, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.   

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, एक दिवस मला कोल्हापूरला येऊन सर्वांना भेटायचे आहे, असे पवार सातत्याने सांगत होते. त्यानुसार आज ते येथे आले. दोन्ही जागा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा मांडव आमच्या दारात घातला गेला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी दोन्ही निवडणुका ताब्यात घ्याव्यात. चंद्रकांतदादा यांची काय उंची आहे? ज्यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही. मात्र, ते गेली ६० वर्षे सातत्याने जे निवडणुका जिंकतात, त्यांच्या विरोधात बोलतात. निवडणूक झाल्यानंतर चंद्रकांतदादांना मानसिक धक्का बसून त्यांना ॲडमिट करण्याची वेळ येऊ नये, ही माझी परमेश्‍वरचरणी इच्छा आहे.’’

ते म्हणाले, ‘धनंजय महाडिक यांनी संसदेत चांगले काम केले. राजू शेट्टी आणि आम्ही आज एकत्रित आलो; पण पुढे पटेल की नाही हे सांगता येत नाही. शेतीशी संबंधित निर्णय घेतले पवारांनी आणि दर दिला शेट्टींनी, असे शेतकरी सांगतात. लोकांनी पैसे देऊन निवडून येणारे शेट्टी हे एकमेव खासदार आहेत.’ प्रा. जयंत पाटील, विश्‍वास देशमुख, डी. जी. भास्कर यांची भाषणे झाली.

Web Title: Loksabha 2019 Dhananjay Mahadik comment in Kolhapur