Loksabha 2019 : छुपा प्रचार सुरू

Loksabha 2019 :  छुपा प्रचार सुरू

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात छुपा प्रचार अन्‌ पडद्यामागील जोडण्या सुरू झाल्या. जो सांगून ऐकत नाही, त्याला अनेक आमिषं दाखवून आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही उमेदवारांना आज (ता. २२)ची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. शेवटच्या टप्प्यात घोळ होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांना जागता पहारा ठेवावा लागेल.

विधानसभेच्या सर्वच मतदारसंघांत कार्यकर्त्यांची दोन दिवसांत खरी कसोटी लागणार आहे. महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक, तसेच महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक; तर हातकणंगलेतील महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी महिन्यापासून पायाला भिंगरी बांधली होती. त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते प्रचारात सहभागी होते.

शहरी तसेच ग्रामीण भागात प्रचाराचे रान उठल्यानंतर शेवटच्या टप्प्यात कोणताही धोका होऊ नये, यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते दक्ष राहू लागले आहेत. आज सायंकाळपासून बॅक ऑफिसची यंत्रणा कामाला लागली. अजूनही कुणाची नाराजी असेल, तर ती विविध मार्गांनी दूर करण्याचे प्रयत्न आहेत. एकेका गावात तीन ते चार गट असतात. आमदारांचा गट, माजी आमदारांचा गट अशी विभागणी आहे. 

कागलमधून आमदार हसन मुश्रीफ यांची, राधानगरी-भुदरगडमधून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चंदगडमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह कुपेकर गट, बाळासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. याच तालुक्‍यात गोपाळ पाटील, भरमू सुबराव पाटील आपली ताकद आजमावत आहेत. गडहिंग्लजमध्ये डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण. बी. एन. पाटील-मुगळीकर, कागलमध्ये संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे, करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार पी. एन. पाटील, अरुण नरके, कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट, उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे.

...तर खासदारकीही धोक्‍यात
उमेदवारांना ७० लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. खासदार धनंजय महाडिक, प्रा. संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, धैर्यशील माने यांच्या खर्चाचा ताळमेळ लागत नाही. उमेदवारांनी दिलेला आणि शासकीय खर्च नियंत्रकांनी नोंद केलेल्या खर्चामध्ये ४० ते ४५ लाखांची तफावत आहे. हा खर्च ७० लाखांपेक्षा जास्त झाल्यास एखादा उमेदवार विजयी झाला असला तरीही त्याला खासदारकीला मुकावे लागणार आहे. निवडणूक निकालानंतर महिन्यात हिशेब द्यावा लागणार आहे. एखादा उमेदवार पराभूत झाला आणि त्यानेही खर्चाचा तपशील दिला नाही, तर त्याला पुढील निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिली.

एकूण मतदार
कोल्हापूरमध्ये नऊ लाख ५७ हजार १८३ पुरुष, नऊ लाख १७ हजार १४३ महिला आणि इतर १९ असे १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार आहेत. हातकणंगलेमध्ये नऊ लाख १४ हजार ३५८ पुरुष, आठ लाख ५८ हजार १३८ महिला आणि इतर ६७ इतर असे १७ लाख ७२ हजार २६४ मतदार आहेत. 

मतदान बाहेर काढण्यासाठी
नेत्यांबरोबर तालुका-तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची ईर्ष्या पणाला लागली आहे. तूर्तास जास्तीत जास्त मतदान बाहेर कसे काढता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर बूथवर कोणते कार्यकर्ते असणार? त्यांच्या न्याहारीची व्यवस्था, ती पोचविणारी यंत्रणा वेगळी, मतदान प्रतिनिधी म्हणून कोण असणार याची यादी निश्‍चित केली जात आहे. प्रचाराची रंगीत तालीम संपल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीचा सामना मंगळवारी (ता. २३) रंगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com