Loksabha 2019 : सांगलीत ६५.३८ टक्के

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ६५.३८ टक्के मतदान झाले. प्रशासनाने वर्गवारी अंतिम झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी मतदान केले.

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ६५.३८ टक्के मतदान झाले. प्रशासनाने वर्गवारी अंतिम झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी मतदान केले. मिरज-सांगली रोडवरील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम मशीन सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्तात ठेवल्या आहेत. मतमोजणी २३ मे रोजी आहे. तोपर्यंत त्यावर पोलिस प्रशासनाचा वॉच असणार आहे. 

सांगली लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (ता.२३) मतदान झाले. बुधवारी पहाटेपर्यंत जिल्हाभरातून मशीन आणण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळपर्यंत उमेदवार  किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत यंत्रांची वर्गवारी करून यंत्रे सील करण्यात आली आहेत. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून खासदार संजय पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर प्रमुख रिंगणात आहेत. या शिवाय अन्य ९ उमेदवारांनीही निवडणूक लढवली. 

सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ५२.५ टक्के, सन २०१४ च्या निवडणुकीत ६३.६८ टक्के मतदान झाले होते. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजे ६९.८५ टक्के, तर सर्वांत कमी सांगली विधानसभा मतदार संघात ६३.०२ टक्के मतदान झाले. यावेळी मतांचा वाढलेला टक्का नेमका कुणाच्या फायद्याचा ठरणार, याची आता गणिते मांडली जाऊ लागली आहेत. जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न, सोशल  साईट्‌स, माध्यमांतील जागृती आणि काट्याच्या  लढतीमुळे राबलेली कार्यकर्त्यांची यंत्रणा याचा परिणाम टक्केवारी प्रथमच ६५ च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघ आणि १,८४८ केंद्रांवर मतदान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Sangli Constituency Voting Politics