Loksabha 2019 : 'गडकरी नको ही मोदींची इच्छा!'

तात्या लांडगे 
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नितीन गडकरी विजयी होऊ नयेत, ही नरेंद्र मोदी यांची सुप्त इच्छा असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

लोकसभा 2019
सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, सत्ता आल्यावर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे आवश्‍यकच होते. आता ती परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे आता आपले अवघड आहे, अशी भिती वाटत असल्याने नितीन गडकरी विजयी होऊ नयेत, ही नरेंद्र मोदी यांची सुप्त इच्छा असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

वंचित बहूजन आघाडी ही प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. 23 मे ला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा आमची ताकद समजेल, वंचितांच्या हाती राज्याच्या सत्तेची चावी असेल, असा विश्‍वासही अॅड. आंबेडकर यांनी व्यक्‍त केला. मागील साडेचार वर्षात देशात कोण मोठा, असा प्रश्‍न जनतेला पडला. मोदी हेच सर्वात मोठे, असे चित्र उभे राहिल्याची सल भाजपला आहे. मोदींच्या विरोधात बोलणारे कमी पडत आहेत. काँग्रेससह अन्य मित्र पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचारासह अन्य प्रकारचे आरोप असल्याने मोदींना सडेतोड कोणीच उत्तर देऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ईव्हिएम मध्ये छेडछाड शक्‍य -
आधुनिक तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, ईलेक्‍ट्रॉनिक यंत्र म्हटलं की छेडछाड होतेच. त्यामुळे एका उमेदवाराला केलेलं मतदान पाहिजे त्याच उमेदवाराला जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर माझी मास्टरकी तीन-चार महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर निवडणूक आयोगालाच समोर घेईन, असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मात्र, संबंधित उमेदवाराला 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाल्यास, ती छेडछाड निष्फळ ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi not wants nitin gadkari statement by Prakash Ambedkar