Loksabha 2019 : कुटुंबातील २७ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क  

पीटीआय
बुधवार, 24 एप्रिल 2019

रास्ता पेठेतील भोसले कुटुंबाचे वर्णन एकत्र राहणारे आणि एकत्र मतदान करणारे, असे करावे लागेल. कारण, या कुटुंबातील तब्बल २७ सदस्यांनी मंगळवारी पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. 

पुणे -  रास्ता पेठेतील भोसले कुटुंबाचे वर्णन एकत्र राहणारे आणि एकत्र मतदान करणारे, असे करावे लागेल. कारण, या कुटुंबातील तब्बल २७ सदस्यांनी मंगळवारी पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. 

या कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ मतदार ९५ वर्षांच्या पार्वतीबाई भोसले या आहेत, तर सर्वांत तरुण मतदार त्यांचा २६ वर्षीय नातू निरंजन आहे. रास्ता पेठेतील एका वाड्यात भोसले कुटुंब राहते. आज या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रच नजीकच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी हजर झाले. या कुटुंबातील सदस्य व माजी नगरसेवक जयसिंग भोसले म्हणाले, ‘‘आम्ही सहा भाऊ आहोत. आमचे एकत्र कुटुंब आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आम्ही एकत्र जातो. मागील काही दिवस आम्ही आजूबाजूच्या परिसरात मतदान करण्याविषयी जनजागृती करीत आहोत. मतदानाचे महत्त्व आम्ही नागरिकांना पटवून देत आहोत.’’ 

‘‘आमच्या कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य माझी आई आहे. ती व्हिलचेअरवर असूनही, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याबाबत ती जागरूक असते,’’ असे त्यांनी नमूद केले. 

आमच्या कुटुंबीयांकडे पाहून नागरिक मतदानाचे कर्तव्य बजावण्यास बाहेर पडल्यास मला आनंद होईल. 
- पार्वतीबाई भोसले, ९५ वर्षांच्या मतदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 members of the family ruled out voting rights in pune