LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध 

LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध 

पुणे : अर्थसंकल्पाच्या 12 टक्के खर्च शिक्षणावर केला जाईल. अभिमत विद्यापीठे आणि शिक्षणातील खासगीकरण मोडून काढून बालवाडी ते द्विपदवीधरपर्यंतचे शिक्षण (केजी टू पीजी) मोफत दिले जाईल. तसेच, सहकाराचे पुनर्जीवन करून, शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने जाहीरनाम्याद्वारे शनिवारी दिले. 

वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव, समन्वयक लक्ष्मण माने, भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, सचिन माळी आणि प्रवक्‍त्या रमा गोरख या वेळी आदी उपस्थित होत्या. सत्ता आल्यास कोणत्याही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. एकाच बोर्डाच्या अधिनियमाखाली सर्व अभ्यासक्रम असतील, अशी यंत्रणा उभी केली जाईल. उपलब्ध सर्व स्रोतांचा वापर करून, शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीजपुरवठा करू. सहकाराची बांधणी ढासळली असून, त्याचे पुनर्जीवन केले जाणार आहे. त्यातून ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार निर्माण केला जाईल. पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षांतून दोनदा एकरी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना संधी उपलब्ध केल्या जातील. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देणार आदी बाबी जाहीरनाम्यात असल्याचे माने यांनी सांगितले. 

मतदान मतपत्रिकेवर घ्या 
देशातील अनेक पक्षांना "ईव्हीएम'वर संशय आहे. असे असतानाही निवडणूक आयोग ईव्हीएमचा आग्रह का धरत आहे? प्रकाश आंबेडकर त्याबाबत बोलले, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. "ईव्हीएम'वर निवडणूक घेण्यास विरोध असून, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी माने यांनी केली. 

"आरएसएस'चे संघटन बेकायदा 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटना, तिरंगा आणि राष्ट्रगीत मानत नाही. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या आरएसएसची अजून नोंदणी नाही. संघटनेवर बंदी आणावी, अशी आमची मागणी नाही. संघटनेचे सभासद असावेत, निवडणूक घ्यावी, अशा बाबी पाळल्या जाव्यात, असे माने म्हणाले. 

- स्वायत्त संस्थांच्या कामात ढवळाढवळ नाही 
- बॅंकेकडून गरिबांना अल्प कर्ज देण्यास प्राधान्य 
- सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे भरणार 
- शेतीची उत्पादकता वाढून शेतमालाला योग्य भाव देणार 
- 15 रुपयांच्या कार्डवर मोफत आरोग्य सुविधा 
- असंघटित कामगारांना विमान वेतन कायदा लागू करणार