Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवा - आढाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

आम्ही आजवर कोणाच्याही विरोधात कधी भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र, नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करा, असे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे.
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

पुणे - भुसार बाजारात हमाल पंचायत संचालित शिदोरीगृहांसाठी सवलतीच्या दरात मिळणारा अन्नधान्य पुरवठा राज्य सरकारने बंद केल्यामुळे तेथील कष्टकरी सामान्य जनतेचा उपजीविकेचा प्रश्‍न अधिकच बिकट झाला आहे.

केवळ हेच नव्हे तर नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे चटके अंगमेहनती कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेलाच अधिक बसले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाकरी फिरवा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले. 

आढाव म्हणाले, ‘‘राज्य सरकारने खुल्या बाजारातील सवलतीच्या दरात मिळणारा अन्नधान्य पुरवठा बंद केला. इलेक्‍ट्रॉनिक वजनकाट्यावर तोलाई बंद केल्यामुळे भुसार बाजारातील तोलणारांवर उपासमारीची वेळ आली. हमाल माथाडी कामगारांना व्यापाऱ्यांनी काम देणे बंद केले, याबाबत पालकमंत्री गिरीश बापट आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे खुल्या बाजारातील असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.’’ कष्टकरी, शेतकरी विरोधातील कायदे, अल्पसंख्याकांना भेदभावाची वागणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी कामगारांच्या विरोधातील कायदे करून सर्वसामान्य जनता विरोधी भूमिका सरकारने घेतली आहे. यामुळे सरकारच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Bhakri Baba Adhav