Loksabha 2019 : ‘कमळा’च्या बहरण्यावर ‘धनुष्यबाणा’ची मदार

Bhosari-Vidhansabha
Bhosari-Vidhansabha

आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता
पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केल्यास महायुतीचे पारडे जड ठरते. त्यातच आमदार महेश लांडगे यांचे संघटनकौशल्य पणाला लागले आहे, त्यावरच महायुतीचे मताधिक्‍य ठरणार आहे. 

शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. तेथून लोकसभेसाठी २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरा सामना महायुतीचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यातच रंगला आहे. आढळराव उद्योजक असून, खासदारकीचा मोठा अनुभव आहे. तुलनेने कोल्हे नवखे असून, निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहेत. मात्र, अभिनेता म्हणून त्यांची ओळख घराघरांत आहे. हीच त्यांची जमेची बाजू आहे. निवडणूक प्रचारातही त्यांनी तोच मुद्दा मतदारांवर ठसवला आहे. आढळराव मराठा तर कोल्हे माळी समाजाचे आहेत. खेड तालुक्‍यासह मोशी, मांजरी व हडपसर परिसरात माळी समाज मोठा आहे. आमदार सुरेश गोरे माळी समाजाचे आहेत. परंतु, ते शिवसेनेचे आहेत. माळी मतदारांनी गोरेंच्या माध्यमातून आढळरावांना पसंती दिली की, कोल्हेंना हे निकालानंतरच कळेल. 

लांडगे यांचा प्रभाव
महापालिकेच्या ११ वॉर्डातील ४४ पैकी ३३ नगरसेवक आमदार महेश लांडगे यांचे समर्थक म्हणजे भाजपचे आहेत. तसेच, सलग दोन महापौर, दोन स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह विषय समित्यांचे अध्यक्षपदही ‘भोसरी’लाच मिळाले आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यांचा परिणाम मताधिक्‍यात किती टक्के होतो, याकडे लक्ष लागले आहे.

२००९ चे गणित 
भोसरी विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत ३०.४६ टक्के मते घेऊन अपक्ष विलास लांडे विजयी झाले होते. शिवसेनेच्या सुलभा उबाळे २९.६९ टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांचा अवघ्या १२७२ मतांनी पराभव झाला होता. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादीच्या मंगला कदम होत्या. त्यांना १६.१७ टक्‍के मते मिळाली होती. उर्वरित २३.६८ टक्के मते अन्य १३ उमेदवारांमध्ये विभागली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लांडे व कदम महाआघाडीत आहेत. त्यांच्या मतांची बेरीज ४६.६३ टक्के होते. ती उबाळे यांच्यापेक्षा दीडपटीने अधिक आहे. मात्र, सध्यास्थितीत भोसरी विधानसभा क्षेत्रात आमदार महेश लांडगे व भाजपचे प्रस्थ मोठे आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची घसरगुंडी होऊन भाजपने ‘कमळ’ फुलविले आहे. सत्ता परिवर्तनात लांडगे यांचा मोठा हात आहे.

२०१४ चे गणित 
राष्ट्रवादी काँग्रेसने विलास लांडे यांना २०१४ मध्ये संधी दिली होती. परंतु, त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांनी २७.१९ टक्के मते घेऊन बाजी मारली होती. शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांना २०.२७ टक्के मिळाली होती. त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. भाजपचे एकनाथ पवार यांनी १९.९८ टक्के मते घेतली होती. ते चौथ्या क्रमांकावर होते. काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ६.४९ टक्के मते मिळाली होती. 
अन्य १२ जण १४.३७ टक्‍क्‍यांत होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आमदार लांडगे (भाजप), उबाळे (शिवसेना), पवार (भाजप) आहेत. त्यांच्या मतांची बेरीज तब्बल ६७.१८ टक्के होते. शिवाय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सोबत आहे. महाआघाडीतील लांडे (राष्ट्रवादी) व काँग्रेस उमेदवाराच्या मतांच्या टक्केवारीची बेरीज केवळ २६.४७ होते. ती महायुतीपेक्षा ४१ टक्‍क्‍यांनी कमी आहे. मात्र, त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्ष (गवई व कवाडे गट) आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com