Loksabha 2019 : शिवाजीनगर, कसबा, कॅंटोन्मेंटवर काँग्रेसची भिस्त

Voting
Voting

पुणे - परंपरागत मतदारांवर लक्ष केंद्रित करून भाजपला खिंडीत पकडण्याची व्यूहरचना काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. शिवाजीनगर, भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा कसबा पेठ आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस अधिक आश्‍वासक असून, याठिकाणी भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश येणार काय, यावरच पुण्याच्या निकालाचे चित्र अवलंबून आहे.

सहा आमदार, ६४ नगरसेवक, दोन मंत्री यांची ताकद असणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला परंपरागत मतांचा गठ्ठा आधी पक्का करावा लागणार आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली असता पुण्यात अडीच ते तीन लाखांपर्यंत काँग्रेसची परंपरागत मते आहेत. यात राष्ट्रवादीच्या मतांचा समावेश आहे. या वेळी गिरीश बापट आणि मोहन जोशी अशी सरळ लढत होत आहे. मनसे काँग्रेससोबत आहे. ‘आप’ने आपला उमेदवार उभा केलेला नाही. ‘आप’ला गेल्या निवडणुकीत २८ हजार ६५७ मते मिळाली होती.

समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची ही मते यंदा काँग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसला भाजपचे मताधिक्‍य तोडण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपला तुलनेने कमी मताधिक्‍य आहे अशा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. 

या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादी, मनसे यांची साथ असल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या मतांची बेरीज केली असता शिवाजीनगर मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या एकत्रित मतांपेक्षा फक्त दोन हजार ७२७ मते कमी मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे पहिले लक्ष्य हे शिवाजीनगर असणार आहे. महापालिका निवडणुकीत मात्र भाजपची या मतदारसंघातील स्थिती अत्यंत मजबूत झाली असून, सर्व बारा जागा भाजपला मिळाल्या आहेत. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण हे सध्या शिवसेनेत आहेत. त्यांची भूमिका काय असणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवेसेनेच्या विधानसभेतील मतांची बेरीज ८३ हजार ५९५ होते. तर काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज ७३ हजार १८५ होती. म्हणजे, या मतदारसंघात दहा हजारांचा फरक आहे. काँग्रेसला या वेळी कसब्यात मताधिक्‍य मिळेल, असा दावा आहे. अर्थात, बापट हे कसबा मतदारसंघातील असून, गेली अनेक वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे कसब्यातून ते जास्तीत जास्त मतदान मिळेल, यासाठी प्रयत्न करतील.

पुणे कॅंटोमेंट हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण, भाजपने मोठ्या फरकाने तो हिसकावून घेतला. विधानसभेत भाजप-शिवसेनेच्या मतांची बेरीज ७१ हजार होते; तर काँग्रेस-मनसे-राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ५९ हजार होते. याठिकाणची ‘दलित-मुस्लिम’ हे पुन्हा वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे.

वडगाव शेरीत भाजप-शिवसेना एकत्र आल्याने भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसला मोठे आव्हान आहे. कोथरूड-पर्वतीमधील भाजपचे वाढते मताधिक्‍य रोखण्यासाठी काँग्रेस काय करणार, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com