Loksabha 2019 : दौंडला रात्री आठपर्यंत मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पैसे वाटपाचा व्हििडओ
लिंगाळी (ता. दौंड) येथे आज मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार घडला. पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  लिंगाळी येथील पासलकर वस्ती येथील मतदान केंद्राजवळ हा प्रकार सुरू होता. वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधितांना जाब विचारताच पैसेवाटप थांबवून त्यांनी काढता पाय घेतला. याची माहिती मिळताच भरारी पथक तेथे दाखल झाले; परंतु त्यांना पैसे वाटणारे आढळून आले नाहीत, असे दौंडचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

दौंड - दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी गर्दी केल्याने रात्री पावणेआठ वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. 

दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय, गीताबाई बंब शाळा, लाजवंती गॅरेला विद्यालयासह तालुक्‍यातील पाटेठाण, नंदादेवी, लोणारवाडी आणि काही गावांत सहा वाजताही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, मतदानाची प्रक्रिया लांबली. मतदान संपल्यानंतर संबंधित केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी हे दौंड येथील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम व मतदान साहित्य जमा करण्यासाठी एसटी बसने रात्री पावणेअकरापर्यंत येत होते. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी उपलब्ध झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Daund Voting Politics