Loksabha 2019 : बापट दिल्लीत गेल्यास पालकमंत्री कोण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. बापट यांच्याकडे सध्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्ये या खात्यांची जबाबदारी आहे. ते दिल्लीत गेल्यास त्यांच्याकडील खाती सांभाळण्यासाठी सक्षम मंत्र्याची गरज भासणार आहे. या पूर्वीच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी जगताप, भेगडे यांनी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे निकालानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात चुरस वाढली असून, ‘लाल दिवा’ कुणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जगताप यांचा दीर्घ अनुभव
लक्ष्मण जगताप यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या साथीने महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या भोवतीच सध्या शहराचे राजकारण फिरत आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी चिंचवडमधून सध्या भाजपकडे जगताप यांचेच एकमेव नाव आहे. शिवाय, ते राहत असलेल्या सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरसह संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्‍य मिळाल्यास व त्यांचा विजय झाल्यास जगताप यांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे. दोन वेळा विधानसभा व एक वेळ विधान परिषद असा विधिमंडळातील १६ वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, लांडगे हेही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.

भेगडे यांचे वजन वाढणार
मावळ तालुक्‍यात गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. तर, विद्यमान आमदार बाळा भेगडे सलग दहा वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत. हॅट्ट्रिकसाठी ते इच्छुक आहेत. सध्या ते जिल्हाध्यक्ष आहेत. यामुळे विधानसभा निवडणूक तिकीटवाटपातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आणि त्यांना मावळातून मताधिक्‍य मिळाल्यास भेगडे यांचे राजकीय पारडे जड होणार आहे. आमदारकीच्या काळात हजारो कोटींचा निधी तालुक्‍यात आणल्याचा त्यांचा दावा आहे. पक्षसंघटनेला बरोबर घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. जिल्हाध्यक्ष असल्याने पक्षातील वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. या जोरावर ते मंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Girish Bapat Delhi Guardian Minister Politics