Loksabha 2019 : कार्यकर्ता हीच माझी ओळख अन्‌ ताकद - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

परीट समाजाचा पाठिंबा
दरम्यान, बापट यांच्या लोकसभा उमेदवारीला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी परीट समाजातर्फे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला नगरसेवक महेश लडकत, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर, उज्वल केसकर यांच्यासह कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे - गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जाती-पातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जिवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे केले.

बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळावा आयोजित केला होता, त्या वेळी ते 
बोलत होते. 

भारतीय दलित कोब्रा संघटनेचे अध्यक्ष ॲड. भाई विवेक चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी भाई चव्हाण, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, महेश लडकत, दीपक पोटे, श्रीपती सोनावणे, सुनील व्हगाडे, राहुल भोसले, राहुल बोराडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बापट म्हणाले, ‘‘पुढच्या पाच वर्षांत आपला खासदार कोण असणार? हे ठरविणारी ही निवडणूक असणार आहे. दैनंदिन जीवनात आपण निरखून-पारखून व्यवहार करीत असतो. हीच पारख लोकप्रतिनिधी निवडतानाही आपण करायला हवी. आमच्या सरकारने गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र आजपर्यंत लोकांना खोटी आश्वासने दिली. सर्वसामान्यांची कामे करताना आम्ही कधी त्याची जातपात पाहिली नाही. पण, विरोधक मात्र माझ्या जातीवरून राजकारण करीत आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Girish Bapat Politics