Loksabha 2019 : मावळात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून पराभवाची मालिका खंडित करायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. तर काहीही झाले, तरी विजयाची हॅटट्रिक साधायची, असा पण शिवसेनेने केला आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून पराभवाची मालिका खंडित करायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. तर काहीही झाले, तरी विजयाची हॅटट्रिक साधायची, असा पण शिवसेनेने केला आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीच्या जागावाटपात मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यापूर्वी त्यांचे गजानन बाबर व सध्याचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रतिनिधित्व केले. आता हॅटट्रिक साधण्याचे आडाखे शिवसेनेने आखले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचा बारणे यांना विरोध आहे. त्यांची मनधरणीचे काम शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते करीत आहेत.

कारण, त्यांना नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी एक-एक जागा जिंकणे गरजेचे आहे. मात्र, गुरुवारी (ता. ४) सायंकाळपर्यंत जगताप यांचे मन वळविण्यास भाजप नेत्यांना यश आले नव्हते. तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाळा भेगडे याच मतदारसंघातील मावळ विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

त्यांच्या दृष्टीनेही येथील विजय महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय, खुद्द मोदींनीसुद्धा दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भाषणात ‘मावळ’चा उल्लेख केला होता. त्यावरून त्यांचेही ‘मावळ’कडे बारीक लक्ष असल्याचे दिसते.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्या संदर्भात खुद्द शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर वाल्हेकरवाडीत जाहीर सभाही घेतली. त्यानंतर अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी जोरदार प्रचार मोहीम उघडली. सर्व मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली. शहर काँग्रेस सुरवातीपासूनच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.

तसेच, मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार सुरेश लाड (कर्जत) यांच्यावर पार्थ यांना मताधिक्‍य देण्याची जबाबदारी आहे. यावरून मावळमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसते.

मतभेद मिटविण्यात राष्ट्रवादीला यश
मावळ तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद मिटविण्यात अजित पवार यांना यश आले आहे. त्यांच्या मदतीला उरण, कर्जत व पनवेल विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आहेत. ‘घाटाखालची काळजी करू नका’, असा शब्द त्यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Constituency Leader Politics Politician