Loksabha 2019 : नवमतदारच निर्णायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

बाबर २३ टक्‍क्‍यांचे खासदार
मावळची पहिली लोकसभा निवडणूक २००९ मध्ये झाली. त्या वेळी १६ लाख चार हजार ८८६ मतदारांपैकी केवळ सात लाख १७ हजार ५४४ मतदारांनी म्हणजेच ४४.७१ टक्के मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांना तीन लाख ६४ हजार ८५७ मते मिळाली होती. म्हणजेच एकूण मतदारांपैकी केवळ २२.७३ टक्के मतदारांनीच निवडलेले ते खासदार होते.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात नवमतदारांचा कौल निर्णायक ठरत असल्याचे गेल्या दोन निवडणुकांत स्पष्ट झाले आहे. दोन्हीही वेळा नवीन मतदारांचे मतदानाचे प्रमाण जास्त राहिले आहे. यामुळे यंदाचा खासदारही नवमतदारांच्या मतदानावरूनच ठरेल, यात शंका नाही. कारण, गेल्या दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल सव्वासहा लाख मतदार वाढलेले आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला. यात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. मावळची पहिली लोकसभा निवडणूक २००९ मध्ये झाली. यंदाची तिसरी लोकसभा निवडणूक आहे. गेल्या दोन निवडणुकीतील मतदार व मतदान विचारात घेतल्यास नवमतदारांचा कौल निर्णायक ठरलेला दिसतो. यामुळे यंदाही त्यांचे मतदान निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. कारण, २००९ मध्ये १६ लाख चार हजार ८८६ मतदार होते. २०१४ मध्ये त्यांची संख्या १९ लाख ५३ हजार ७४१ होती. यंदा चक्क २२ लाख २७ हजार ६३३ आहे. २००९ च्या तुलनेत ही संख्या सहा लाख २२ हजार ७४७ ने अधिक आहे. यावरून प्रत्येक निवडणुकीत मतदारांची संख्या वाढलेली दिसते. 

बारणे विजयी; टक्केवारी कमी
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. त्या वेळी १९ लाख ५३ हजार ७४१ पैकी ११ लाख ७४ हजार ३९३ मतदारांनी म्हणजेच ६०.११ टक्के मतदारांनीच आपला हक्क बजावला होता. पाच लाख १२ हजार २२६ मते घेऊन बारणे विजयी झाले होते. हे प्रमाण एकूण मतदानाच्या ४३.६२ टक्के होते. मात्र, एकूण मतदारांचा विचार केल्यास केवळ २६.२१ टक्के मतदारांनीच निवडलेले खासदार बारणे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Constituency Voting New Voter