esakal | Loksabha 2019 : आमदारांसाठी ही निवडणूक ‘लिटमस टेस्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Constituency

निवडणूक लोकसभेची असली, तरी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही ‘लिटमस टेस्ट’ असल्याने त्यात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यमान आमदारांची धावपळ सुरू आहे. मतदारसंघातील मताधिक्‍य कमी झाले, तर त्याचा परिणाम थेट विधानसभेच्या उमेदवारीवर होणार असल्याने आमदारांनी प्रचारात जोर लावला आहे. पुणे कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, शिवाजीनगर मतदारसंघांत मताधिक्‍य कमी होणार नाही, याची भाजप दक्षता घेत आहे.

Loksabha 2019 : आमदारांसाठी ही निवडणूक ‘लिटमस टेस्ट’

sakal_logo
By
संभाजी पाटील

पुणे - निवडणूक लोकसभेची असली, तरी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही ‘लिटमस टेस्ट’ असल्याने त्यात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यमान आमदारांची धावपळ सुरू आहे. मतदारसंघातील मताधिक्‍य कमी झाले, तर त्याचा परिणाम थेट विधानसभेच्या उमेदवारीवर होणार असल्याने आमदारांनी प्रचारात जोर लावला आहे. पुणे कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, शिवाजीनगर मतदारसंघांत मताधिक्‍य कमी होणार नाही, याची भाजप दक्षता घेत आहे.

लोकसभेनंतर काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हवी असेल, तर ‘लोकसभेत आपला ‘परफॉर्मन्स’ दाखवा’, असा फतवा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काढल्याने आमदारांची कसोटी लागली आहे.

पुण्यातील आठही आमदार भाजपचे असून, त्यात पुणे मतदारसंघात सहा, शिरूरमध्ये एक (हडपसर) आणि बारामतीमध्ये एक (खडकवासला) येतो. 
गेल्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांना सहाही मतदारसंघांत मताधिक्‍य होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही भाजपची कामगिरी चांगली राहिली. पुणे कॅंटोन्मेंट हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेस विचारसरणीचा मानला जातो. दलित-मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसला या मतदारसंघात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मताधिक्‍य मिळाले आहे. पण गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे.

काँग्रेसने या निवडणुकीत हा मतदारसंघ ‘टार्गेट’ केला आहे. त्यामुळे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची जबाबदारी वाढली आहे. ही निवडणूक लक्षात घेऊनच स्थायी समितीचे अध्यक्षपद सुनील कांबळे यांना देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत किती मताधिक्‍य मिळणार, याकडे पक्षश्रेष्ठींची लक्ष असेल.

वडगावशेरी मतदारसंघात शिरोळे यांनी ४२ हजारांचे मताधिक्‍य मिळवले होते. येथेही स्थायी समितीचे अध्यक्षपद आमदारांचे बंधू योगेश मुळीक यांना देण्यात आले होते, त्यामुळेच मुळीक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. बापट यांच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिवसेनाही या जागेसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या मतदारसंघातून किती मताधिक्‍य मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. 

कोथरूड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त आहे. शिवसेनेचाही या जागेचा आग्रह असेल, त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा प्रयत्न आमदार मेधा कुलकर्णी यांचा आहे. स्वत: बापट यांचा कसबा मतदारसंघ आहे. पण कसब्यात चांगले काम करून बापट यांना खूष केले, तरच आपल्याला संधी मिळेल हे इच्छुकांनी ओळखले असल्याने पक्षाचे काम करण्यासाठी त्यांचीही चढाओढ लागली आहे. पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ यांना ‘हॅटट्रिक’ करून मंत्रिपदापर्यंत पोचायचे असल्याने त्यांनीही प्रयत्न सुरू केलेले दिसतात.

भाजपचे मताधिक्‍य (२०१४)
वडगाव शेरी   :     ४२४०९ 
शिवाजीनगर  :     ३९१४१
कोथरूड         :     ९१८९८
पर्वती            :     ६९६७८
पुणे कॅंटोन्मेंट :     १३९३१
कसबा पेठ      :     ४०८९८

loading image