Loksabha 2019 : उत्साह आणि जोश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.

उत्साह 
पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला. 

वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन कार्यालयापासून सकाळी पावणेअकराच्या सुमारास पदयात्रेस प्रारंभ झाला. त्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पार्थ यांचे बंधू जय सहभागी झाले. तत्पूर्वी पार्थ यांनी एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खराळवाडीतील महात्मा जोतिबा फुले, मोरवाडी चौकातील अहल्यादेवी होळकर आणि निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आहेर गार्डन येथे आले. पदयात्रेत सर्वांत पुढे पाचचाकी सायकल रॅली होती. त्यावर होर्डिंग व झेंडे लावलेले होते. त्यामागे डीजे होता. त्यावर ‘राष्ट्रवादी’चे गीत वाजवले जात होते. उघड्या जीपमध्ये पार्थ व जय होते. त्यामागील जीपमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यानंतरच्या जीपमध्ये महिला पदाधिकारी होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीसह शेकाप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे, उपरणे व टोप्या त्यांनी घातल्या होत्या. पायी कार्यकर्त्यांमागे दुचाकी व चारचाकी होत्या. पदयात्रा सुरू झाली तेव्हा उन्हाचा पारा चढलेला होता. घामाच्या धारा वाहत होत्या. घोषणाबाजी सुरू होती. रखरखत्या उन्हात चालणाऱ्या कार्यकर्त्यांना वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौकात दिलासा मिळाला. कारण, काही कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. 

प्राधिकरण कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरातील रस्ते रहदारीस बंद होते. साधारण दोन तासांनी पदयात्रा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळ पोचली. दुपारी एकच्या सुमारास पार्थ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर कलाटे व जय पवार होते.

जोश
पिंपरी - ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘अप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, अशा घोषणा, ढोल-ताशांचा गजर, अशा जोशपूर्ण वातावरणात मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. ९) जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

आकुर्डी येथील खंडोबाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये बैलगाडीचे सारथ्य करीत बारणे यांनी दुपारी दोन वाजता प्राधिकरण कार्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. पदयात्रेत युतीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेमध्ये बारणे यांच्यासह खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर, शिवसेनेचे राज्य संघटक  गोविंद घोळवे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महिलांचा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग दिसत होता. डोक्‍यावर भगव्या रंगाचा फेटा आणि खांद्यावर उपरणे अशा पेहरावात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमुळे या परिसरातील वातावरण पूर्णपणे भगवे होऊन गेले होते. आकुर्डी गावठाण भागात मिरवणूक येताच तिथे पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, दुपारी बारानंतर उन्हाचा चटका वाढत गेला. मात्र, कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम होता. पदयात्रेमध्ये तीन खुल्या जीपगाड्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत महिला नगरसेविका होत्या. अन्य दोन गाड्यांमध्ये युतीचे पदाधिकारी होते. याखेरीज दोन बैलगाड्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देणारा विजयरथ यामध्ये होता. त्याच्या पाठीमागे युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या ४० ते ५० गाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. मावळ भागातील २२ ढोल-ताशा पथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती. दोनच दिवसांपूर्वी श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये मनोमीलन झाल्यामुळे या पदयात्रेत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांकडून हे शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले.

काही काळासाठी वाहतूक विस्कळित
खंडोबामाळ चौकातून पदयात्रेला सुरवात झाल्यानंतर काही काळासाठी या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. हा रस्ता अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पदयात्रा सुरू होण्याअगोदर बारणे यांनी मतदारांशी हस्तांदोलन करीत त्यांच्याशी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 NCP Shivsena Politics Parth Pawar Shrirang Barne