Loksabha 2019 : ‘ईव्हीएम’मध्ये कोठेही बिघाड नाही - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

ईव्हीएमबाबत खोटी तक्रार
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एसएसपीएमएस शाळेतील मतदान केंद्रामध्ये एका मतदाराने ईव्हीएम मशिनवर बटन दाबल्यास दुसऱ्याच उमेदवाराला मत जात असल्याची तक्रार केली. निवडणूक अधिकाऱ्याने त्याची पडताळणी केली. त्यात मतदाराने चुकीची तक्रार केल्याचे निदर्शनास आले. संबंधित मतदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राम यांनी सांगितले.

पुणे - शहरात ईव्हीएम मशिनमध्ये कोठेही बिघाड झाला नाही; परंतु पाच मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. परंतु अर्ध्या तासात तेथील मशिन बदलण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. मागील पुणे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्‍केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. यापुढील काळात मतदानवाढीसाठी आणखी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत राम यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी या वेळी उपस्थित होते. राम म्हणाले, ‘‘पुणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५४ टक्‍के मतदान झाले होते. त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने ‘स्वीप’अंतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे यंदा मतदानाची टक्‍केवारी ६० टक्‍क्‍यांपर्यंत जाईल, असे वाटत होते. आपण कोठे कमी पडलो, याचा विचार करावा लागेल.’’ 

पुणे कॅंटोन्मेंटमधील दहा हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. त्यात स्थलांतरित, दुबार नावे आणि मृत मतदारांचा समावेश होता, दिवसभरात ३० ते ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. कसबा पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूल मतदान केंद्रावर एका निवडणूक कर्मचाऱ्याने विशिष्ट पक्षाला मतदान करा, असे आवाहन केल्याबाबत विरोधकांनी तक्रार केल्याची चर्चा होती. 

या संदर्भात राम म्हणाले, ‘‘याबाबत पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. याप्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 No Problem in EVM Machine Collector