Loksabha 2019 : प्रचारामध्ये तरुणी आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत रॅली, भेटीगाठी, कोपरा सभांमध्ये विविध राजकीय पक्षांतील युवतींचा सहभाग वाढू लागला आहे. प्रचाराच्या नियोजनाबरोबरच सोशल मीडियासह वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही राजकीय पक्ष त्यांच्याकडे देऊ लागले आहेत.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत रॅली, भेटीगाठी, कोपरा सभांमध्ये विविध राजकीय पक्षांतील युवतींचा सहभाग वाढू लागला आहे. प्रचाराच्या नियोजनाबरोबरच सोशल मीडियासह वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही राजकीय पक्ष त्यांच्याकडे देऊ लागले आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन पत्रके वाटणे, महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रचार करणे किंवा एकूणच प्रचाराची रणनीती आखणे, यामध्ये प्रामुख्याने तरुण कार्यकर्त्या अग्रभागी आहेत. कोपरा सभांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर राजकीय पक्ष देत आहेत. काही तरुणींवर सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राजकीय प्रचारात यापूर्वी तरुणींचा सहभाग हा मर्यादित दिसत असे. आता राजकारणात तरुणींचा सहभाग वाढल्याचे चित्र आहे. याबद्दल भाजप पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या अपर्णा लोणारे म्हणाल्या, ‘‘आता प्रचारात मोठ्या संख्येने तरुणी सहभागी आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेणे, महाविद्यालयांत जाऊन युवकांना पक्षाच्या धोरणाविषयी माहिती सांगणे आदी कामे त्या करीत आहेत. तसेच, अनेक जणी स्वतःहून काम करायला तयार होत आहेत. अनेक तरुणी मतदानाच्या दिवशी बूथसाठीही काम करायला उत्सुक आहेत.’’

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर सरचिटणीस सोनाली गाडे म्हणाल्या, ‘‘प्रत्येक बूथनुसार पक्षाच्या साधारण चार ते पाच तरुण कार्यर्त्या आहेत. प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना भेटणे. कुटुंबामध्ये सदस्य किती आहेत?, त्यांचे मतदान केंद्र कोणते आहे? याबद्दल ॲपद्वारे आम्ही त्यांना माहिती देत आहोत. रॅली, सभांसाठी संपूर्ण नियोजन करण्यात तरुणी पुढाकार घेत आहेत.’’

विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव गीतांजली पुणेकर म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय महिला नेत्यांपासून ते युवती कार्यकर्त्यांपर्यंत युवतींचा सहभाग वाढला आहे. सर्वसामान्य तरुणींना मोठ्या सभांना प्रत्येक वेळी जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी छोट्या सभा घेतल्याने त्यांची स्थानिक राजकारणातील आवड वाढली आहे. त्यामुळे तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Publicity Girl