Loksabha 2019 : शिरूरला अटीतटीची; बारामतीत प्रतिष्ठेची लढत

Narayangaon
Narayangaon

राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव
नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत होईल,’’ अशी टीका शिरूर लोकसभेचे आघाडीचे उमेदवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. 

खासदार शिवाजीराव पाटील यांनी बुधवारी जुन्नर तालुक्‍याच्या मध्यभागातील पंचवीस गावांचा प्रचार दौरा केला. नारायणगाव रात्री झालेल्या सभेत खासदार आढळराव पाटील यांनी महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. या वेळी आमदार शरद सोनवणे, गटनेत्या अशा बुचके, माऊली खंडागळे, संतोष खैरे, भगवान घोलप, संभाजी तांबे, सरपंच योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, अर्चना माळवदकर, देवराम लांडे आदी उपस्थित होते. खासदार आढळराव पाटील म्हणाले, ‘‘विमानतळ, बैलगाडा शर्यत, प्रलंबित रेल्वे प्रकल्प व महामार्गाचे काम हे राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पाप आहे. मात्र याचे खापर माझ्या माथी फोडले जात आहे. मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीची दहा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याने विकास कामासाठी निधी मिळाला नाही. खेड ते सिन्नर दरम्यान, महामार्गाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. वीस टक्के काम तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहे. देशाला पंतप्रधान मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही.’’ आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘डॉ. अमोल कोल्हे हे उसने उमेदवार असून, ते जरी डॉक्‍टर असले तरी मी तालुक्‍याचा डॉक्‍टर आहे.’’ या वेळी सोनवणे यांनी माजी आमदार वल्लभ बेनके, युवा नेते अतुल बेनके यांच्यावर टीका केली. बुचके म्हणाल्या, ‘‘खासदार आढळराव पाटील लोकसभा निवडणुकीत चौकार मारून केंद्रात मंत्री होणार आहेत.’’ या वेळी सरपंच पाटे यांच्या हस्ते आढळराव पाटील यांना चौकार मारण्यासाठी बॅट भेट देण्यात आली. नारायणगाव गटातून सहा हजार मतांची आघाडी देण्याचे आश्‍वासन पाटे, खंडागळे, खैरे यांनी दिले. सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले. सभेचे नियोजन संतोष दांगट, अरिफ आतार, अनिल खैरे यांनी केले.

शिरूरच्या विकासासाठी जिवाचे रान करीन - अमोल कोल्हे
रांजणगाव सांडस - शिरूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी मी जिवाचे रान करीन, अशी ग्वाही महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस, नागरगाव, कुरुळी, आलेगाव पागा, राक्षेवाडी येथे बुधवारी प्रचारसभेत ते बोलत होते. माजी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती सुजाता पवार, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, पुणे जिल्हा दूध संघाचे (कात्रज) संचालक जीवन तांबे, घोडगंगा कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, माजी संचालक झुबंरअण्णा रणदिवे, संचालक सुदाम साठे, रवींद्र काळे, सरपंच उत्तम लोखंडे, सुरेश रणदिवे, सुदाम रणदिव, अमोल काळभोर, अजित रणदिवे, कमलाकर साठे, पांडुरंग रणदिवे, महेश ढमढेरे, सागर रणदिवे उपस्थित होते. कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, सुजाता पवार, अशोक पवार, प्रदीप कंद यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदारांची आश्वासने भूलथापाच
कुरुळी - खासदारांनी दिलेली आश्वासने म्हणजे केवळ भूलथापा आहेत. तुमचे सरकार दरबारी असणारे प्रश्न मी सोडवीन, अशी ग्वाही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. मोई (ता. खेड) येथे कोल्हे बोलत होते. यावेळी खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारे यांनी कोल्हे यांना प्रचारासाठी ५० हजार रुपयांची मदत केली. मोई ग्रामस्थांनीही एक लाख रुपयांची मदत जमा करून दिली.  याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com