Loksabha 2019 : श्रीरंग बारणे यांना भावकीतूनच विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भावकीतून विरोध झाला आहे. थेरगाव येथील बारणे परिवाराने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भावकीतून विरोध झाला आहे. थेरगाव येथील बारणे परिवाराने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे.

मावळची उमेदवारी बारणे यांना देऊ नये, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली होती. त्या वेळी बारणे आडनावाच्या पाच नगरसेवकांचाही त्यात समावेश होता. मात्र, आता बारणे व जगताप यांच्यात मनोमीलन झाले आहे. जगताप यांनी सक्रिय प्रचार सुरू केला आहे. यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जगताप यांच्यासोबत असलेल्या बारणे कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिला आहे.

यामध्ये नीलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे व शंकर बारणे आदींचा समावेश आहे. त्यांनी शुक्रवारी थेरगाव भागात प्रचारात असलेले पार्थ यांची भेट घेतली. गेल्या पाच वर्षांत खासदार म्हणून बारणे यांनी कोणतेही काम केलेले नाही. थेरगावचे अनेक प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत; त्यामुळे पार्थ यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या समोरील अडचणी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Oppose Politics