Loksabha 2019 : विरोधकाचे डिपॉझिट जप्त करा - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

आढळरावांच्या मंत्रिपदासाठी ठाकरे राजी
सभेत प्रत्येक नेत्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांमधून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलायला उभे राहताच चोहोबाजूने ‘शिरूर’ला मंत्रिपद मिळावे, अशी घोषणाबाजी झाली. त्यावर ठाकरे यांनी सांगितले की, चौथ्यांदा खासदार होणाऱ्या आढळराव यांना दिल्लीत काय न्याय द्यायचा, तो या वेळी देण्यात येईल. त्यावर आढळरावांच्या नावाचा जयघोष झाला.

चाकण - ‘तुम्हाला तुमच्या सोबत राहणारा खासदार पाहिजे की चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम करणारा खासदार पाहिजे,’’ असा सवाल करून, ‘‘समोरच्या उमेदवाराला ना शेंडा ना बुडखा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.

त्यामुळे त्यांना मतरूपी आशीर्वाद द्या आणि समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा,’’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, महायुतीच्या विरोधात बिनबुडाची आघाडी तयार झाली आहे. राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकू. आढळरावांनी पाच वर्षांत बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. बैलगाडा शर्यतीचा विषय मी सोडविणार आहे, दुसरे कोणी नाही. तुम्ही मत वाया घालवू नका. आमच्याकडे पंतप्रधान मोदी आहेत, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारही ठरलेला नाही.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. पक्षातून कधी कोणाला काढतील, हे सांगता येत नाही. त्यांनी या मतदारसंघात जो उमेदवार उभा केला आहे; त्याला तेवीस तारखेनंतर चपराशी म्हणून दारात उभे करतील. .

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘माझ्या खासदारकीच्या सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात होते. त्यांनी मला विकासासाठी दमडाही दिला नाही. केंद्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर विकासकामे होत आहेत. विरोधी उमेदवाराचा काही अभ्यास नाही. तो लोकांमध्ये नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Uddhav Thackeray Speech Politics Shivajirao Adhalrao