Loksabha 2019 : आधी मतदान करा, मग गावाला जा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

युवकांचे प्रमाण वाढले
खानदेश अहिराणी कस्तुरी मंच संस्थेच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांनी सांगितले, ‘‘मंडळाचे सुमारे चारशे ते पाचशे सभासद आहेत. युवकांचे प्रमाण वाढले आहे.’

पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

शहरात राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासारख्या विविध भागांतून स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर मित्र मंडळ, सातारा, सांगली मित्र मंडळ यांसह साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारीही मंडळे आहेत. शहरातील बहुसंख्य मतदारांचे मतदान मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. 

शहरातील विविध कंपन्यांमध्ये हंगामी स्वरूपात काम करणारे कामगार, शहरात नव्यानेच राहायला आलेल्या रहिवाशांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे. तेथील उमेदवारांकडून अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या मतदारांशी संपर्क साधण्यास सुरवात झाली आहे. अशा मतदारांची नावे, पत्ते शोधणे, त्यांच्या बैठका घेणे सुरू झाले आहे. 

यासंदर्भात कोल्हापूर मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी सांगितले, ‘‘येत्या तीन-चार दिवसांत बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपणार आहेत. त्यानंतर नागरिक गावी जातात. शाहूनगर येथे आमच्या मंडळाची रविवारी (ता. १४) बैठक आहे. या बैठकीत आम्ही मतदान होईपर्यंत गावी जाऊ नये, असे आवाहन करणार आहोत.’’ 

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, ‘‘शहरात मराठवाड्यातून आलेले सुमारे चार लाख नागरिक आहेत. यापैकी दहा टक्के जणांचे मतदान गावी असते. ज्यांचे मतदान येथे आहे, त्यांनी मतदान होईपर्यंत गावी जाऊ नये, असे आवाहन आम्ही केले आहे.’’ त्याव्यतिरिक्तही विविध समाजाची मंडळे कार्यरत आहेत.’’   

कोकण मराठा संघाचे शहराध्यक्ष संजय साळवी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या पाच जिल्ह्यांमधील रहिवाशांची ही संस्था आहे. शहरातील आमची लोकसंख्या चार लाखांहून अधिक आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमच्याशी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने संपर्क साधलेला नाही. मुलांच्या परीक्षा संपत असल्या तरी नागरिक लगेच सुटीसाठी गावी जातील, असे वाटत नाही. निवडणुकीसाठी बहुसंख्य मतदार शहरात थांबतील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting Candidate Village