Loksabha 2019 : मतदान केंद्रांवर ‘वेब’ची नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

अडीच हजार ईव्हीएम मशिन
या संपूर्ण मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी २५०४ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स वापरण्यात येणार आहेत. याखेरीज ४४७ ईव्हीएम आणि ७४८ व्हीव्हीपॅट मशिन राखीव ठेवण्यात आली आहेत. पनवेल आणि चिंचवडमध्ये मतदारांची संख्या जास्त असल्याने पनवेलमध्ये सर्वाधिक ५८४, तर चिंचवडमध्ये ४७० मशिनचा वापर करण्यात येणार आहेत. ऐनवेळी तांत्रिक मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागल्यास त्यासाठी १४ हजार ४८८ कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. खेरीज अडीच हजार पोलिस आणि बाराशे होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात २०८ कॅमेऱ्यांद्वारे होणार चित्रीकरण
पिंपरी - मावळ लोकसभा मतदार संघातील २०८ मतदान केंद्रांवर वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पनवेलमध्ये सर्वाधिक ५८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वांत कमी नऊ मतदारसंघ चिंचवड मधील आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून करण्यात येणारे चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिसणार आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अकरा दिवसच बाकी राहिल्यामुळे त्यासाठीची सरकारी यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या (ईव्हीएम) तयारीचे काम सुरू झाले असून, पुढील आठवड्यात ते पूर्ण होणार आहे. या वेळच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्याची हाताळणी कशी करायची, तांत्रिक दोष निर्माण झाल्यास काय करायचे, याच्या सूचना या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

७३ अतिसंवेदनशील केंद्रे
मावळ लोकसभा मतदार संघात ७३ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १९ केंद्रे ही पिंपरी मतदार संघात आहेत. कर्जत आणि मावळमध्ये प्रत्येकी १६ केंद्रे आहेत. पनवेलमधील दहा, चिंचवडमधील नऊ आणि उरण मतदार संघातील तीन केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या केंद्रांवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय
मतदान केंद्रे 

पनवेल :     ५८४
कर्जत :     ३४३
उरण :     ३३९
मावळ :     ३६९
चिंचवड :     ४७०
पिंपरी :     ३९९
एकूण :     २,५०४
वेब कॅमेरे असणारी केंद्रे 
पनवेल :     ५८
कर्जत :     ३५
उरण :     २९
चिंचवड :     ९
पिंपरी :     ४०
एकूण :    २०८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting Center Web Camera Watch