Loksabha 2019 : कुटुंबातील बत्तीस जण मतदानासाठी एकत्र

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 April 2019

आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. मात्र, मतदानासाठी सर्वांनी एकत्र जाण्याचे ठरविले. जाताना नागरिकांना संदेशही द्यायचा होता, त्यामुळे महिलांच्या हातात मतदार जागृतीचे फलक देऊन प्रबोधन केले. अनेकांनी हे पाहून मतदानासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंद होत आहे.
- प्रमोद रणनवरे, कुटुंबातील सदस्य

मांजरी - विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती आपण नेहमी पाहत असतो; मात्र लोकशाहीच्या या उत्सवातही एकत्रित जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हडपसर येथील रणनवरे कुटुंबाने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. मतदानाला जाताना चक्क या कुटुंबातील बत्तीस जणांनी घरापासून मतदान केंद्रापर्यंत पायी जात मतदान करण्याचे आवाहन करीत नागरिकांमध्ये प्रबोधनही केले.

गोंधळेनगर परिसरात रणनवरे कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी राहतात; मात्र खास मतदानासाठी या कुटुंबातील सर्वच्या सर्व बत्तीस मतदार नटून-थटून एकत्र आले होते. या सर्वांनी घरातील ८३ वर्षीय सर्वांत ज्येष्ठ जयसिंगराव रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली बंटर शाळा येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी गोंधळेनगर ते मतदान केंद्रापर्यंत हातात मतदान जागृतीचे फलक घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन केले. ‘देशहिताचे भान १०० % मतदान’ असे फलक घेऊन या कुटुंबातील महिलांनी गोंधळेनगरपासून बंटर हायस्कूल केंद्रापर्यंत पायी चालत प्रबोधन केले.

या कुटुंबातील व्यक्ती उद्योजक, इंजिनिअर, नोकरदार, नाट्य, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मतदान किती श्रेष्ठ आहे, याची जाणीव नागरिकांना झाली पाहिजे, यासाठी आम्ही हा प्रयोग राबविला असल्याची भावना या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting Family