Loksabha 2019 : यंदा 'पुणे' मतदानात उणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- राज्यातील सर्वाधिक कमी मतदान पुण्यात
- राहुल गांधी वगळता भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही पुण्यात आले नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले पण त्यांना सभा घेतली नाही. 
- भाजप अध्यक्ष अमित शहाही बारामतीमध्ये आले पण, पुण्यात नाही. 
- काँग्रेसच्या प्रियंका गांधींचा रोड शो पुण्यात होणार होता, पण झाला नाही

पुणे : पुण्यातील लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण न झाल्यामुळेच शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक कमी मतदान पुण्यात झाले. भाजप- काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते यंदा पुण्यात फिरकलेच नाही. त्यामुळे पुण्यातील प्रचाराचे किंवा राजकीय वातावरण तापलेच नाही. परिणामी पुण्यातील मतदारांमध्ये निरुत्साह निर्माण झाला अन् त्यांचे प्रतिबिंब मतदानात उमटले. 

त्यामुळे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघात 42 ते 51 टक्के मतदान होत असताना पुण्यात मात्र 43.48 टक्के मतदान झाले आहे. पुण्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे सुमारे तीन लाखांच्या मताधिक्‍याने निवडून आले होते. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत आठ मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवडून आले तर, महापालिका निवडणूुकीतही भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही भाजपची पुण्यातील जागा 'ए' प्लस असल्याचा दाखला दिला जात होता. त्यामुळेच उमेदवारी जाहीर झाल्यावरही भाजपच्या गिरीश बापट यांचा आस्तेच प्रचार सुरू होता तर काँग्रेसचेही उमेदवार मोहन जोशी यांची अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20-21 दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली. त्यांनाही प्रचाराला वेळ कमी मिळाला. त्यामुळे पुण्यात वातावरण निर्मिती झालीच नाही. 

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद वगळता भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही पुण्यात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले पण त्यांना सभा घेतली नाही की, कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही. भाजप अध्यक्ष अमित शहाही बारामतीमध्ये आले पण, पुण्यात त्यांनी काही केले नाही. काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचा रोड शो पुण्यात होणार, असे सांगितले जात होते. परंतु, तो ही झाला नाही. भाजप, काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही एखादा दुसरा अपवाद वगळता पुण्यात आले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा खडकवासला मतदारसंघासाठी झाली तर, उद्धव ठाकरेही पुण्यात आले नव्हते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lowest poll in the state is in Pune