esakal | Loksabha 2019 : पुण्यात टक्का घसरला; बारामतीत वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : पुण्यात टक्का घसरला; बारामतीत वाढला

पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४ टक्के मतदान झाले होते.   बारामती मतदारसंघात मात्र मतदान तीन टक्‍क्‍याने वाढून ते ६१ टक्‍क्‍यांवर पोचले.

Loksabha 2019 : पुण्यात टक्का घसरला; बारामतीत वाढला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४ टक्के मतदान झाले होते. शहरी भागात ही स्थिती असली तरी, बारामती मतदारसंघात मात्र मतदान तीन टक्‍क्‍याने वाढून ते ६१ टक्‍क्‍यांवर पोचले. मतदान केंद्रांमधील बदल आणि मतदारयाद्यांतील घोळ आदी किरकोळ तक्रारी वगळता पुणे आणि बारामतीमध्ये शांततेत मतदान झाले. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानयंत्राबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने या निवडणुकीत प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ मशिनचा वापर करण्यात आला. त्यामुळे आपण कोणाला मतदान केले हे मतदारांना दिसले. पुण्यात २०.७१ लाख मतदार होते. त्यापैकी ५२ टक्के मतदारांनीच आपला हक्क बजावला. या टक्केवारी अंतिम नसल्याने त्यात बदल होऊ शकतो, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील मतदान यंदा वाढेल असा अंदाज होता. पण एकूणच शहरातील मतदारांनी दाखविलेल्या निरुत्साहामुळे पुण्याची टक्केवारी घसरली. २००९ मध्ये ४०.६७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर प्रथमच पुणेकरांनी एवढ्या कमी प्रमाणावर मतदान केले. २०१४ च्या निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ४९.८९ टक्के मतदान झाले होते. याच मतदारसंघात यंदा शहरात सर्वाधिक म्हणजे ५०.४१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातच सर्वाधिक ४.४४ लाख मतदार असल्याने या मतदारसंघातील कल निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकणारा असेल. वडगावशेरीच्या खालोखाल पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात ४९.८७ टक्के मतदान झाले आहे. शहरात सकाळपासूनच पेठांचा भाग, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर भागात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी नऊनंतर शहरात विविध मतदान केंद्रांवरील गर्दी वाढली. दुपारी मतदान पुन्हा मंदावले होते. दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा मतदार बाहेर पडले. 

बारामतीत उत्साहाचे वातावरण
पुण्यात हे चित्र असताना खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात चुरस असल्याने बारामती मतदारसंघात मात्र मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मतदारांच्या उत्साहामुळे या मतदारसंघाच्या टक्केवारीत सुमारे तीन टक्‍क्‍यांनी वाढ झाली. बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकी एवढेच म्हणजे ७०.२४ टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा ४० हजार मतदारांची वाढ झाली होती. त्यामुळे बारामतीकरांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे. बारामती खालोखाल इंदापूरमध्ये सरासरी ६१ टक्के, भोरमध्ये ६०, पुरंदरमध्ये ५८, दौंडमध्ये ५९ तर खडकवासल्यात ५२ टक्के मतदान झाले. दौंड मतदारसंघातील काही मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. निवडणूक आयोगाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत मतदानाचे आकडे निश्‍चित झाले नाहीत. त्यामुळे अंतिम आकडेवारी बुधवारीच हाती येईल, असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. 

बारामती मतदारसंघात खडकवासला भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागात सकाळी अकरापर्यंत चांगले मतदान झाले. पुरंदर तालुक्‍यातील खळद गावातील एका मतदाराने पत्नीच्या अंत्यविधीनंतर मतदान केले. ग्रामीण भागात मतदानासाठी चांगलीच चुरस असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. 

अनेक मतदारांचे पत्ते बदलले आहेत; तर काहींचे नाव मतदार यादीमध्ये नाही, यासह अनेक कारणांनी मतदानाचा टक्‍का घसरला आहे. तरीही जनतेने भाजपवर विश्‍वास ठेऊन मतदान केल्याने यामध्ये मी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईन.
- गिरीश बापट, उमेदवार, महायुती

पाच वर्षांत पुणेकर भाजपच्या कारभाराला कंटाळले होते. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात पुणेकरांनी कौल दिला आहे. मीच विजयी होणार आहे. २३ मे नंतर पुणे शहरात विकासाचे नवे सुवर्णपर्व सुरू होणार आहे.
- मोहन जोशी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार

लोकसभा 2019

loading image